उल्हासनगर : शहर पूर्वेतील कोरोना संसर्गित पोलिसाच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. याप्रकाराने पालिकेच्या चिंतेत वाढ झाली असून पोलीस कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःहून कोरोना तपासणी साठी पुढे येण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.उल्हासनगर कॅम्प नं-४ संभाजी चौक परिसरातील जिजामाता कॉलनी येथे राहणारा मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई कुटुंबासह राहतो.
पोलीस शिपायाला दोन दिवसापूर्वी ताप आल्याने, त्याने महापालिकेच्या फिव्हर क्लिनिक मध्ये तपासणी केली. तसेच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार टेऊराम येथील स्वाब सेंटर मध्ये थ्रोट स्वाब दिला. सोमवारी पोलिसाला कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाल्यावर महापालिका कर्मचाऱ्याची एकच धावपळ उडाली. परिसर सिल करून पोलिसाला शहर को रोना रुग्णालयात उपचार सुरु केले. पोलीस शिपायांची पत्नी, मुलगा व दोन मुली यांना सावधगिरीचा उपाय म्हणून विलगीकरण केंद्रात ठेवले. त्यांचा घेतलेला थ्रोट स्वाब अहवाल मंगळवारी उशिरा पोझीटीव्ह आला. या प्रकाराने पालिकेच्या चिंतेत भर पडली असून पोलीस शिपायाच्या कुटुंबातील चौघांना कोरोना रुग्णालयात उपचार सुरू केले. पोलीस शिपायांचा कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. तसेच परिसर पूर्णतः सील करून निर्जंतुकरन केले आहे.