निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्ष, नेते यांना सामान्यांचा कळवळ येतो. तुमच्यासाठी आम्ही किती करतो हे सांगण्यासाठी स्पर्धा लागते. पण ज्यावेळेस त्याच सामान्य व्यक्तीवर संकट कोसळते, एखाद्याच्या घरातील प्रमुख व्यक्ती अपघातात मरण पावते तेव्हा ही मंडळी कुठे असतात हा खरा प्रश्न आहे. मदत तर सोडाच पण सांत्वनासाठीही त्यांना जावेसे वाटत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. अपघातानंतर राजकीय धुरळा उडतो. पण ती शमल्यानंतर अपघात झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे हे अधिकारी, नेत्यांना जाणूनही घ्यावेसे वाटत नाही. त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्या कुटुंबाला कशाप्रकारे मदत करता येईल याचा विचारही ही भ्रष्टाचाराने बरबटलेली मंडळी करू शकत नाही.मी रा भार्इंदर महापालिकेच्या अनागोंदी कारभाराने हेमंत कांबळे या तरुणाचा बळी घेतला आणि त्याचे कुटुंब उध्वस्त केले. अवघ्या ३३ वर्षाचा हेमंत गोपीचंद कांबळे हा तरूण दुचाकीवरून जात असताना खड्ड्याला वाचवण्याच्या प्रयत्नात खाली पडला आणि मागून आलेला ट्रक जीव घेऊन गेला. पोलिसांनी केवळ ट्रकचालकावर खापर फोडून बळीला कारणीभूत ठरणाऱ्या खड्ड्याच्या मायबापांना मात्र अभय दिले. तर महापालिका आणि लोकप्रतिनिधींकडून मदत तर दूरच साधे कांबळे कुटुंबीयांचे सांत्वनही केले नाही. खड्ड्याला जबाबदार असणाºया पालिकेवर गुन्हा दाखल होऊन त्यांना शिक्षा होत नाही, आणि पुन्हा खड्ड्याने कुणाचा बळी जाणार नाही अशी ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत हेमंतला न्याय मिळणार नाही अशी उद्विग्नता कुटुंबीयांनी व्यक्त केली. शनिवार १७ आॅगस्टची ती दुपार कांबळे कुटुंबीयांसाठी काळवंडलेली ठरली. बोरिवलीच्या दत्तपाडा मार्ग येथे राहणारा हेमंत कांबळे (३३) हे मीरा रोडच्या रामदेव पार्क भागात राहणारा भाऊ संदीप, वडील गोपीचंद कांबळे (६७ ) व आई छाया कांबळे (५५) यांना भेटण्यासाठी आला होता. हेमंत हा त्यांचा सर्वात धाकटा मुलगा. हेमंत सहा वर्षाची लहान मुलगी व पत्नीसोबत बोरिवलीला राहयचा. आईवडिलांची विचारपूस करुन तो दुचाकीवरून घरी जायला निघाला. काशिगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर अरबाज गॅरेज समोरच खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कांबळेची दुचाकी घसरुन खाली पडली. त्याने डोक्यात हॅल्मेटही घातले होते. पण मागून आलेला सिलिंडरने भरलेला ट्रक त्याच्या अंगावरुन गेला आणि तो जागीच ठार झाला. काशिमीरा पोलिसांनी ट्रकचालक मुकेश अर्जुन राजभर याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. हेमंतच्या अशा तरुण वयात अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर काय आघात झाला असेल याची आपण कल्पना न केलेली बरी. त्याच्या अवघ्या सहा वर्षांच्या मुलीचे पितृछत्र हरपले. पत्नीला तरूण वयात पतीच्या झालेल्या मृत्यूचा आघात आयुष्यभर राहिल. आई - वडिलांचा तर काळजाचा तुकडाच हरपला. कांबळे कुटुंबीयांच्या वाट्याला आलेल्या दु:खाला संतापाचीपण एक किनार आहे. ज्या खड्ड्यामुळे बळी गेला त्या खड्ड्याला कारणीभूत असणारे मात्र मोकाट आहेत याची चीडही त्यांना आहे. खड्ड्यामुळे एका होतकरु तरुणाचा बळी गेला, त्याचे कुटुंब उध्वस्त झाले याचे साधे सोयरसूतक महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींना नाही. कांबळे याच्या मृत्यूनंतर महापालिकेने काही वेळातच तो खड्डा भरला. परंतु त्याच्या आजूबाजूला असलेले अन्य खड्डे मात्र तसेच ठेवले.>पोलिसांना कांबळे कुटुंबीयांनी विनवणी करूनही त्यांनी पालिके विरोधात कार्यवाही करण्यास स्पष्ट नकार दिला. राजकारण खेळण्या पलिकडे वेळच नसल्याने खड्डे व खड्ड्यामुळे बळी जाऊन एखादद्याचे कुटुंब उद्धवस्त झाले तरी या निगरगट्टांना फरक काहीच पडत नाही.>उल्हासनगरात तिघांचे बळीउल्हासनगर शहरात मागील दोन महिन्यात खड्डयामुळे तिघांचा बळी तर असंख्य जखमी झाले. दरवर्षी अनेकांचे बळी जाऊनही जाग न येणाºया महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. कॅम्प नं-३ हिराघाट पंचशीलनगर येथे रवी तपसी जैस्वाल १३ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान कामानिमित्त रस्त्याच्या एका बाजूने जात होते. त्यावेळी खड्डयामुळे आलेला ट्रक रवी यांच्या अंगावरून गेला. यामध्ये रवी यांचा जागीच मृत्यू झाला. रवी आई-वडील, भाऊ व बहिणी समवेत राहत होता. कुटुंबाचा आधार हरविल्याची प्रतिक्रिया कुटुंबाने दिली. महापालिकेने कुठलीही मदत केली नसल्याचे सांगितले. ट्रक मालकानेही मदतीचा हात दिला नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. कॅम्प नं-३ शांतीनगर मुख्य रस्त्यावरून अर्जुन पाल हा मालकाची हब्बीबउल्ला व शहाउल्ला या दोन मुलांना घेऊन दुचाकीवरून जात होता. त्यावेळी भरधाव जाणाºया डंपरचे खड्डयामुळे टायर फुटून लोखंडी रिंग पाल यांच्या दुचाकीवर आदळली. दोन वर्षाच्या हब्बीबउल्ला शेख गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मोठा भाऊ शहाउल्ला व स्वत: अर्जुन गंभीर जखमी झाले. यातही पालिकेने मदत केलेली नाही कॅम्प नं-३ परिसरात राहणाºया बहिणीला भेटून सुनील पवार घरी जात होते. त्यावेळी भरधाव आलेल्या ट्रकखाली चिरडले गेले. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी अपघात झाला त्या मुख्य रस्त्याची चाळण झाली असून खड्डयामुळे अनेकदा येथे अपघात होवून असंख्य जण जखमी झाले आहेत. सुनील कॅम्प नं-४ ओटी सेक्शन भीमनगर येथील राहणारा असून त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंब उघडयावर पडले. पालिकेने खड्डयाने मृत्यू झाला नसल्याचा कांगवा करून मदतीची मागणी साफ धुडकावून लावली.>खड्ड्यांमुळे बळी गेले नाहीतशहर अभियंता व बांधकाम विभागाचे प्रमुख महेश शितलानी यांनी रस्त्यावर दरवर्षी कोटयवधी रूपये खर्च केले जातात असे सांगितले. शहरातील अर्धेअधिक रस्ते काँक्रिटचे असून चांगल्या स्थितीत आहे. मात्र डांबरीकरणाचे रस्ते खड्डेमय झाल्याची कबुली दिली. तसेच खड्डयामुळे तिघांचा बळी गेल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
कर्ती व्यक्ती गेल्याने कुटुंब आर्थिक विवंचनेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:23 AM