जितेंद्र कालेकर -ठाणे : कौटुंबिक कारणातून तसेच प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातून ३,१९४ जण बेपत्ता झाले. त्यातील १,७९७ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. लहान मुले किंवा किशोरवयीन मुलेच बेपत्ता होतात किंवा घरातून पळून जातात असे नाही. काही अपहरणाचे अपवाद वगळता, अनेक व्यक्ती या स्वत:हून घरातून निघून गेल्याचे आढळते. यामध्ये अनेक मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो. तर काहींना आईवडील रागावल्याचे रुचत नसते. काहींना अल्पवयातच आपल्या जोडीदाराकडे जाण्याची ओढ लागते. मग, घरातील विरोध झुगारून पळून जाण्याची तयारी ही मुले ठेवतात. अनेक प्रकरणांत अल्पवयीन मुलांच्या बाबतीत ती नेमकी कशामुळे व कशी बेपत्ता झाली, याची माहिती सुरुवातीला उपलब्ध नसते. त्यामुळे यात अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. अपहरण झाले असल्यास संबंधित आरोपींचाही शोध घेतला जातो.कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर पोलीस तत्काळ तपास सुरू करतात. तक्रार मात्र २४ तासांनी दाखल होते. २०१९ मध्ये २०३० पुरुष तर २,४३२ महिला बेपत्ता झाल्या. त्यातील १,६९६ पुरुष व २,१५४ महिलांचा शोध लागला आहे. उर्वरितांचा शोध सुरू आहे.
घर सोडून जाण्याचे कारणव्यक्ती व कुटुंबपरत्वे मुले, मुली आणि प्रौढ व्यक्तींमध्ये घर सोडण्याची कारणे ही वेगवेगळी असली तरी बऱ्याच प्रकरणांत पती-पत्नींमधील विकोपाला जाणारे वाद, प्रेमप्रकरणामध्ये घरातून लग्नाला विरोध असल्यास मुले आणि मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय कर्जबाजारीपणा, मनोरुग्ण किंवा स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्ती घरातून बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले आहे.२०२० मध्ये एकूण ३,१९४ बेपत्ता झाले. तर १,७९७ जणांचा शोध लागला.