कल्याण : प्रसिद्ध कवी व गीतकार मधूकर घुसळे यांचे वयाच्या 72 व्या वर्षी ह्रदयविकाराने आज निधन झाले. ते कल्याण पश्चिमेतील अशोकनगर वालघूनी परिसराती राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे.
भीमगीते व लोकगीते लिहणारे घुसळे हे रेल्वेत नोकरीला होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात त्यांच्या मित्रंसोबत मैफल जमायची. त्यात त्यांचे काव्य व गीतलेखन खुलले. सोनियाची उगविला सकाळ हे भीमगीत त्यांनी लिहिले होते. ख्यातनाम लोकगीत व भीमगीताचे गायक आनंद शिंदे यांनी ते गायले होते. त्याचबरोबर एक वरमाई रुसली ऐन लग्नात हो जी हे गीत दिवंगत प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायले होते.
त्याचबरोबर, डोकं फिरलंय, आत्ता काय लाजायचे ही लोकगीतेही त्यांनी लिहिली होती. त्यांचे डोकं फिरलयं या लोक गीताने धम्माल उडवून दिली होती. अत्यंत गाजलेले हे गीत देखील आनंद शिंदे यांनी गायले होते. हुंड्यांची रित काळी हे लोक गीत त्यांनी लिहून समाजात प्रबोधन करणारी गीतेही लिहिली होती.