लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : सध्या अवकाळी तसेच पिकांवरील रोग अशा दुष्टचक्राला बळिराजा तोंड देत पुढे जातोय. हे दुष्टचक्र थांबण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञानाची गरज असून, एसआरटी म्हणजेच सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक हे अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आहे. याद्वारे शेतकऱ्यांना फायदा होतोय, ही निश्चितच बदलाची नांदी आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे यासाठी राज्य शासन नक्कीच पुढाकार घेईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
नेरळ येथील सगुणा बाग येथे एसआरटी शेतकरी कृषी सन्मान सोहळा व परिसंवादात सोमवारी ते बोलत होते. यावेळी मंचावर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खा. श्रीरंग (आप्पा) बारणे, देवगिरी कल्याण आश्रम बारीपाडा, धुळेचे प्रांत अध्यक्षा चैतराम पवार, आ.महेंद्र थोरवे,आ. भरत गोगावले, कृषिरत्न शेतकरी सगुणा बाग चंद्रशेखर (दादा) भडसावळे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोकरा प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय कोळेकर, एसआरटी शेतकरी परशुराम आगिवले, अनिल निवळकर, चित्रकार राकेश देवरुखकर यांचा सन्मान करण्यात आला.
५२ शेतकऱ्यांचा सन्मानयावेळी ५२ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. अनिल निवळकर यांची संकल्पना आणि राकेश देवरुखकर यांनी काढलेल्या भूमातेच्या चित्राचे मुख्यमंत्री व विशेष पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच सगुणा फाउंडेशन डॉट एनजीओ या संकेतस्थळाचे प्रतीकात्मक उदघाटन करण्यात आले.
शासकीय पाठबळ मिळाल्यास बदल घडेलयावेळी कृषिभूषण शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी एसआरटीचे महत्त्व विशद केले. मला राजकारणातील जास्त कळात नाही, पण काही महिन्यांपूर्वी क्रांतिकारी निर्णय घेऊन बदल घडवून आणला. एसआरटीला शासकीय पाठबळ मिळाल्यास शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडेल असेही ते म्हणाले.
आज रासायनिक शेती फोफावली आहे. अवकाळीवर मात करण्यासाठी शाश्वत शेतीचे तंत्रज्ञान गरजेचे आहे. भडसावळे यांनी हे तंत्र विकसित केले याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. शेती हा कृषी यज्ञ आहे, तो अखंड धगधगता ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री