ठाणे : गटशेती करीत असल्यामुळे सिंचनाची व्यवस्था झाली. त्यामुळे भेंडी, मिरची, गवार या भाज्यांचे मोठ्या प्रमाणात गेल्यावर्षी उत्पन्न घेतले. याशिवाय, ट्रॅक्टर आणि शेततळ्याचा लाभ झाल्याचे वास्तव शहापूर तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी जानकी तुकाराम बगळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी 'विकेल ते पिकेल' या कृषी विभागाच्या आॅनलाइन कार्यक्रमात संवाद साधताना मांडले.
शहापूर तालुक्यातील चार शेतकऱ्यांपैकी जानकीबार्इंनी मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधून आपल्या गटशेतीचे महत्त्व पटवून दिले, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले. याआधी रानभाज्या विकून या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत असे. कृषी विभागाने त्यांना 'विकेल ते पिकेल' कार्यक्रमात सहभागी करून घेत यंदा त्यांच्या रानभाज्यांचे प्रदर्शन कल्याण व ठाणे येथे भरवून तब्बल २० हजार रुपयांच्या रानभाज्यांची विक्री झाल्याचे बगळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले. गटशेती केल्यामुळे आर्थिक फायदा होत आहे. आता त्यांच्या गटाकडून जिल्ह्यातील शहरांना ताजा भाजीपाला व रानभाज्या पुरवण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
१०० एकरचा आहे गट : शहापूरजवळील अंदाडच्या रासदोपाडा येथील या जानकीबाई आहेत. त्यांचा १०० एकरचा गट आहे. त्या एका कंपनीशी संलग्न होऊन गटशेती करतात. ७० एकरच्या गटात त्या भेंडी, काकडी, दोडके, मिरची, मेथी, वांगी आदी भाजीपाल्याचे उत्पन्न घेतात. वर्षाकाठी लाख रुपये लाभ होतो. तीन शेततळी मंजूर झाली आहेत. दोन ट्रॅक्टर विकत घेता आले. रानभाज्या वाळवून त्या २० वर्षांपासून विकत आहेत.