नितिन पंडीत
गोदाम प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेत शेतकऱ्यांना मोबदला न देता उलट वाढीव क्षेत्राची खरेदी करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीतील पिंपळास गावात समोर आला आहे. विशेष म्हणजे वाढीव जमीन विकत घेतल्यानंतर त्याचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना न देता परस्पर शेतावर मातीचा भराव टाकण्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या नंतर बांधकाम व्यावसायिक आपल्या जागेवर भरणी करेल या भीतीने शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शनिवार पासून ऐन थंडीत शेतावरच आंदोलन करण्यास सुरुवात केली.
भिवंडी तालुक्यातील पिंपळास येथील शेतकरी धोंडू तुकाराम पताळे व तानाजी मारुती पताळे यांची मोजे पिंपळघर येथे सर्व्हे नं ११७/३/अ ४५ गुंठे , ११७/१२ येथे १७ गुंठे तर सन ११९/१ ब २८ गुंठे अशी सुमारे सुमारे ९० गुंठे शेत जमीन असून पिंपळास ग्राम पंचायत हद्दीत भूमी वर्ल्ड या गोदाम संकुलाच्या व्यावसायिकाने गोदाम प्रकल्पासाठी ९० गुंठे जमिनी पैकी २८ गुंठे जमीन विकत घेतली होती . मात्र जमीनीचे खरेदीखत करतांना शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत व्यावसायिकाने संपूर्ण ९० गुंठे जमिनीचे खरेदी खत केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे . विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाली असल्याने भूमी वर्ल्डच्या बांधकाम व्यावसायिका विरोधात न्यायालयात दावा देखील दाखल केला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना शेतकऱ्यांच्या घरी साखरपुड्याच्या कार्यक्रम असल्याने शेतकरी घरच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे पाहून व्यावसायिकाने शेतात मातीची भरणी करण्यास सुरुवात केली.
विशेष म्हणजे रात्री काळोखाचा फायदा घेत कुणालाही कानोसा लागणार नाही अशा पद्धतीने शेतात भरणी करण्यात येत होती मात्र आपल्या शेतात माती भरणी होत असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शेतावर धाव घेत कुटुंबासह कडाक्याच्या थंडीत आपल्या शेताचे रक्षण करीत आहेत . विशेष म्हणजे बांधकाम व्यावसायिक शेतजमिनीवर जी भरणी करत असून ती अनधिकृत असून शासनाचे स्वामित्व धनाची रक्कम न भारताचं केली असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे . तर बांधकाम व्यावसायिक पैशाच्या जोरावर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून पोलिसांची भीती घालत आहे , मात्र जोपर्यंत बांधकाम व्यावसायिकाचा खोटारडेपणा समोर येऊन त्यावर गुन्हा दाखल होत नाही व आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीवरून हटणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी धोंडू पताळे, तानाजी पताळे , गीतांजली पताळे यांनी दिली आहे.