जनार्दन भेरे ।लोकमत न्यूज नेटवर्कभातसानगर : शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या भेंडीला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. आॅरगॅनिक पद्धतीने पिकवलेली ५०० ते ६०० क्विंटल भेंडी तालुक्यातून दररोज परदेशात विक्र ीसाठी जात आहे.
सर्वात जास्त भेंडी उत्पादक म्हणून शहापूर तालुक्याचे नाव अग्रेसर आहे. त्यापैकीच एक गाव तुते. येथे भेंडीचे उत्पादनही घेतले जाते. मात्र, या भेंडीला योग्य भावच नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. विशेष म्हणजे, तीनचार वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात आॅरगॅनिक पद्धतीच्या शेतीवर भर देत असून याच पद्धतीने उत्पादित केलेल्या भेंडीला २७ ते २८ रुपये किलोचा दर मिळतो आहे. तर हीच भेंडी दुकानातून ५० ते ६० रु. किलोने विकली जाते. भेंडी उत्पादित करणाऱ्या प्रत्यक्ष शेतकºयाला जो मोबदला मिळायला हवा, तो मिळत नाही तसेच त्याबाबत कुणी आवाजही उठवत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात.
तुते गावातील शेतकरी भाऊ पांढरे यांनी आपल्या दोन एकर जागेत भेंडीची लागवड केली असून त्यांच्याकडून दररोज तीन क्विंटल इतकी भेंडी परदेशात विक्र ीसाठी जाते. पण, योग्य बाजारभावच नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. योग्य भाव मिळाल्यास दीड लाख रुपयांपर्यंत फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंत त्यांचा केवळ ६० हजार रुपयांचा खर्च झाला असून १० दिवसांपासून त्यांनी उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यापर्यंत हे उत्पादन घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.