अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण २३ हजार ५८९ कृषिपंप ग्राहक असून, त्यांच्याकडे २८ कोटींचे वीजबिल थकीत आहे. मात्र, राज्य शासनाच्या विविध योजनेतील तरतुदींमुळे एकूण थकबाकीपैकी दोन कोटी २१ लाख रुपये माफ झाले आहेत. आता परिमंडळातील शेतकऱ्यांकडे २५ कोटी ७७ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. त्यापैकीही नव्या धोरणानुसार सगळ्या थकबाकी केवळ पन्नास टक्के म्हणजेच १२ कोटी ८८ लाख रुपये चालू वीजबिलासह एकरकमी भरल्यास उर्वरित पन्नास टक्के थकबाकी माफ होणार आहे. मात्र, अनेक ग्राहकांनी वेळेवर कृषिपंपांची वीजबिले मिळत नसल्याचे सांगितले.
महावितरणकडून सुरू झालेल्या वसुलीतून दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत, चालू वीजबिलासह थकबाकीच्या चार कोटी ५८ लाख रुपयांचा भरणा करून महावितरणला त्वरित प्रतिसाद दिला असला, तरीही अजूनही सगळेच शेतकरी याला प्रतिसाद देतीलच, असे चित्र नाही. तरीही महावितरण याबाबत आशावादी आहे, तसेच अनेकांना वीजबिल वेळेत मिळत नाहीत, मिळाली तरी ती भरण्याच्या अडचणी असतात, तसेच शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबत समस्या असतात, त्यांचे निराकरण होणे गरजेचे असते, ते होत नसल्याने काही प्रमाणात शेतकरी बिल भरण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचेही सांगण्यात आले.
-------------
कृषिपंप ग्राहकांच्या बाबतीत शहरी भागांत दरमहा तर ग्रामीण भागात दर तीन महिन्यांना वीजबिल वितरित करण्यात येते. कल्याण परिमंडळात ५० टक्के माफीनंतर आता तर चांगली वसुली सुरू असून, शेतकरी खूप प्रतिसाद देत आहेत. त्यांना अडचणी असतील, तर त्याही आम्ही सोडवू.
- विजयसिंह दूधभाते, जनसंपर्क अधिकारी, कल्याण परिमंडळ, महावितरण
-------------
आम्हाला तीन महिन्यांतून कृषिपंप बिले येतात. काही वेळेस मागेपुढे होते. रक्कम जास्त असल्यास ते भरताना अडचणी येतात, पण आता जी सुविधा दिली आहे, त्यामुळे काहींची तर बिले माफ झाली आहेत, तर काहींना ५० टक्के सवलत मिळाली आहे. त्या योजनांचा लाभ घेऊन सवलत पदरात पाडून घ्यावी.
- शांताराम सासे, शेतकरी, शहापूर
-------------
कृषिपंप वीजबिल काही कालावधीनंतर येतात. कधी दोन, तीन तर कधीतरी सहा महिन्यानेही आले आहे, पण बिल येतात, अनेक जण ती भारतात, काही जण परिस्थितीमुळे भरत नाही, पण सवलत मिळाली की तातडीने त्याचा लाभ घेऊन शेतकरी बिल भरण्याच्या मानसिकतेत असतात.
- राजा निपुर्ते, शेतकरी, शहापूर
-------------
मला २०१६ पासून कृषिपंप वीजबिल मिळालेले नाही. मी पाठपुरावा केला, त्यामुळे २०१८ पर्यंत वर्षातून स्वतः एकदा बिल आणत होतो, पण त्यानंतर पत्र, निवेदन देऊनही काही फरक पडत नसल्याने मी थकलो. अनेकदा पावसात वैगरे वीजतारा तुटतात, त्याबद्दलही बराच खटाटोप करत असतो, पण महावितरणचे उदासीन धोरण की काय, म्हणून मला तरी सुविधा मिळालेल्या नाहीत, हे वास्तव आहे. मी अजूनही बदल होतील, अशी अपेक्षा करत आहे.
- पंकज झाम्बरे, शेतकरी,दहागाव, पोई
-------------
जिल्ह्यातील कृषिपंपचालक - २३,५८९
वीजबिल थकबाकी - १२ कोटी ८८ लाख रुपये
-------------