ठाणे : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील सर्वात मनात भरणारी गोष्ट म्हणजे या आंदोलनात सर्वत्र पसरलेली सकारात्मकता, अशा शब्दांत परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाचे संपादक अभय कांता यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले.
पुणे ते दिल्ली किसान ज्योतयात्रेत सहभागी ठाणेकर व लॉकडाऊनच्या संकटाने सैरभैर झालेल्या कष्टकऱ्यांना, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना, घरकाम करणाऱ्या महिलांना, फेरीवाल्यांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना मोफत अन्नधान्य, औषधे, गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात पुढाकार घेतलेल्या ठाण्यातील युवकांचा आणि या कार्यात सहभागी झालेल्या समाजसेवी संस्थांचा रविवारी समता विचार प्रसारक संस्थेतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी ग्रंथसंग्रहालयात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी भूषवले. यावेळी कांता यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना सांगितले की, सरकारने आणि सरकारच्या पाठीराख्यांनी या आंदोलनाला बदनाम करण्याचे शक्य ते सर्व मार्ग अवलंबले, जेणेकरून याला समर्थन करण्यासाठी इतर लोकांनी इथे येऊ नये. तरीही या आंदोलनाची तीव्रता अजून तशीच प्रखर आहे. इथे देशाच्या सीमांचे रक्षण करणारे अनेक जवान सुट्टीत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. खऱ्या अर्थाने जवान – किसान युती इथे नांदताना दिसून आली. खलिस्तानींपासून आंदोलनजीवीपर्यंत अनेक अपशब्दाने संबोधूनही या शेतकऱ्यांचा निर्धार किंचितही कमी झालेला नाही. अतिशय ताकद देणारे असे हे आंदोलन आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे एकलव्य कार्यकर्ता सुशांत जगताप याने तर आभारप्रदर्शन संस्थेतील सहसचिव अनुजा लोहार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी केले.
---------
फोटो मेलवर