लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : मलंगड रोडवर असलेल्या ज्या द्वारली गावातील जमिनीवरून भाजप आ. गणपत गायकवाड व शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात राडा सुरू आहे, ती जमीन ग्रामस्थ एकनाथ नामदेव जाधव यांची शेतजमीन आहे. गोळीबाराचे कारण ठरलेली द्वारलीतील जमीन देण्यास शेतकऱ्याचा विरोध आहे.
दहा वर्षांपूर्वी गणपत गायकवाड यांनी ती विकत घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. आ. गायकवाड यांनी न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली होती. जाधव यांनी आपला जागेवरील ताबा सोडला नव्हता. जागेचा व्यवहारच पूर्ण झाला नसल्याचे जाधव यांचे म्हणणे असून त्यामुळे त्यांनी जागेवरचा ताबा सोडण्यास विरोध केला. जाधव आणि गायकवाड यांच्यात वाद सुरू असतानाच आ. गायकवाड यांनी या जागेला तारेचे कुंपण घातले. त्यानंतरही यांच्यात वाद सुरू होता. जागेची पाहणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आ. गायकवाड हे स्वतः द्वारली गावात गेले होते. यावेळी जाधव कुटुंबीयांनी त्यांना कडाडून विरोध केला. एवढेच नव्हे तर महिलांनी आमदारांना खडे बोल सुनावले होते.
शेतकऱ्यांनी न्याय मागण्यांसाठी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे दाद मागितली. त्यामुळे या जमिनीच्या वादाला गणपत गायकवाड विरुद्ध महेश गायकवाड संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले. शुक्रवारी त्या वादग्रस्त जागेला घातलेले कुंपण तोडण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने आ. गायकवाड यांचा पुत्र वैभव हिललाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. त्यानंतरच दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमले. त्यातून वादावादी होऊन गोळीबाराची घटना घडली.