मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेकडून शेतकरी आठवडाबाजारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कंत्राटदाराच्या फायद्यासाठी मीनाताई ठाकरे मंडईतून पालिकेने हुसकावून लावत लक्ष्मी पार्क भागात चक्क पदपथावर शेतकऱ्यांना बसवले. पण, शेतकऱ्यांना पदपथावर बसवल्यानंतर महिना झाला, तरी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहाची व्यवस्थाच पालिकेने केलेली नाही. पालिका आणि लोकप्रतिनिधींमार्फत शेतकऱ्यांच्या चालवलेल्या या छळाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
रामदेव पार्क येथील मंडईच्या आरक्षणात पालिकेने मंडईसह दुकाने काढली असून वरच्या दोन मजल्यांवर चक्क सभागृह बांधले आहे. हे सभागृह कंत्राटदारास भाड्याने देण्याआड पालिकेने खालील दुकाने व मंडईतील गाळेही कंत्राटदारास आंदण दिल्याचा तसेच सभागृह भाड्याने देण्यात कंत्राटदार मनमानी लूट करत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. दररविवारी मंडई-सभागृहाच्या आवारात अर्ध्या दिवसासाठी सरकारी योजनेनुसार भरणारा शेतकरी आठवडाबाजारही पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला.शेतकऱ्यांना हुसकावून लावत पदपथावरच बसवण्याचे प्रकार पालिकेने केले. शेतकरी बाजार येथेच ठेवावा, म्हणून परिसरातील रहिवाशांनी पत्रे दिली. भाजप सोडून अन्य पक्षांनीही शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, अशी निवेदने दिली. तरीही, आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित आदींनी कंत्राटदारासाठी शेतकरी बाजार कायमचा बंद करायला लावला. ठाकरे मंडईत त्यांचा जम बसला होता.
मात्र, मंडईतील बाजार बंद पाडून शेतकऱ्यांना कनकियाच्या लक्ष्मी पार्कजवळील पदपथावर आठवडाबाजारासाठी जागा देण्यात आली.पण, त्याला महिना झाला तरीही पालिकेने या शेतकºयांना स्वच्छतागृहासह साध्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करून दिली नाही. शनिवारी सायंकाळी नाशिकहून भाजीपाला घेऊन निघायचे. रविवारी मध्यरात्री वा पहाटे आल्यावर पदपथावर सकाळ होण्याची वाट पाहायची. सकाळी उठल्यावर अंघोळ, प्रातर्विधीसाठी कुठलीही सोय नाही. दुपारपर्यंत रस्त्याशेजारील पदपथावर धूळ व ऊन खात बसणाऱ्या शेतकऱ्यांचे असे अमानवीय हाल पालिकेकडून सुरू आहे. पण, येथे हाल सहन करायचे, वर ग्राहकही नसल्याने ते मेटाकुटीला आले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पालिकेच्या अमानवीय छळ आणि अत्याचाराला कंटाळून रविवार बाजारात यायचेच बंद करून टाकले आहे. सध्या केवळ दोनच शेतकरी येथे येत असल्याचे कालच्या रविवारवरून दिसून आले.