ठाणे: प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी यंदाच्या खरीप हंगामपासून तीन वर्षाकरिता राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्यासंखेने लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
खरीप हंगाम पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण वर्ग आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेची जिल्हास्तरीय बैठक समित सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पार पडली.यावेळी कृषी संजीवनी सप्ताह 1 ते 7 जुलैदरम्यान सर्व तालुक्यात राबविण्यात येत आहे.या कृषी संजीवनी साप्ताहाच्या अनुषंगाने प्रचार प्रसार व प्रसिध्दी करण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, अग्रणी बॅक प्रंबंधक जयानंद भारती, विमा कंपनीचे चीफ मॅनेजर सचिन सुरवसे उपस्थित होते.
नैसर्गिक आपती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे आदींसाठी शेतकर्यांना या विम्याचा लाभ होणार आहे. प्रधाननमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने करणारे शेतकरी पण पात्र आहे. सर्व अधिसूचित पिकासाठी ७०% असा निश्चित करण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या ५ वर्षाचे सरासरी उत्पन्न गणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाणार आहे.