ठाणे - मुंबईसारख्या शहरात सिडकोचे एखादे घर असावे, असे स्वप्न उराशी बाळगून परभणी या दुष्काळग्रस्त जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या विष्णुदास चापके यांनी घरासाठी काही रक्कमही जमा केली. परंतु, लहानपणापासून जग फिरायचे मनी असल्याने अचानक ते पैसे जगभ्रमंतीसाठी वापरून तीन वर्षांपूर्वी निघालेले विष्णुदास हे गुरुवारी सायंकाळी ठाण्यात परतले. यावेळी बहिणीने त्यांचे स्वागत केले. ठाण्यात पाय ठेवताच त्यांनी पहिले फलाटावर डोके टेकवून मातृभूमीला वंदन केले. मात्र, हा प्रसंग पाहण्यासाठी शेतीच्या कामामुळे शेतकरी असलेले आईवडील त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहू शकले नाहीत, अशी खंत त्यांच्या बहिणीने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.विष्णुदास हे मूळ परभणीतील पूर्णा तालुक्यामधील काटनेश्वर येथील शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झाले. बहुतांश हा भाग दुष्काळी समजला जातो. त्यांचे शालेय शिक्षण परभणीत झाल्यानंतर त्यांनी पुणे गाठले. तेथे त्यांनी एमए केले. त्यानंतर, त्यांनी थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर नवी मुंबईत एका ठिकाणी एक वर्ष लेक्चरर म्हणून काम केले. मात्र, तेथे मन रमले नाही. याचदरम्यान ते प्रसारमाध्यम क्षेत्रात आले. दोन इंग्रजी वृत्तपत्रांत काही वर्षे काम केले. त्यातूनच मुंबईत घर घेण्यासाठी जमवाजमव सुरू केली. पण, लहानपणी जग फिरायचे स्वप्न पाहिले असताना, त्या रकमेतून जगभ्रमंतीसाठी त्यांनी १९ मार्च २०१६ रोजी ठाण्यातून प्रवासाला सुरुवात केली. ठाण्यातून ते कोलकाता येथे गेले. तेथून म्यानमार गाठले. या प्रवासात त्यांच्याकडील पैसे संपले. यावेळी त्यांच्या मदतीला त्यांची मित्र मंडळी धावून येत मदत केली. त्यानंतर, अडीअडचणी वाढण्यास सुरुवात झाल्यावर टाटा सोशल ट्रस्ट त्यांच्या मदतीसाठी धावून आले. अशा प्रकारे तीन वर्षे चार दिवसांत चार खंडांतील ३५ देशांची भ्रमंती त्यांनी केली. याचदरम्यान, त्यांनी प्रत्येक देशात एक आठवण म्हणून वृक्षारोपण केले आहे.शेतकरी कुटुंबातील असतानाही विष्णुदास याची देश फिरण्याची इच्छा होती. पण, पैसे नव्हते. याचदरम्यान, त्याने मुंबई गाठून घर घेण्यासाठी पैसे जमा केले. परंतु, लहानपणी त्याचे जगभ्रमंतीचे स्वप्न असल्याने तो अचानक भ्रमंतीला निघाला. खडतर प्रवासानंतर तो गुरुवारी ठाण्यात परतला. मात्र, शेतीचे काम असल्याने त्याच्या स्वागताला आईवडील आले नाही.- संगीता नेवल, विष्णुदास यांची बहीणभ्रमंतीसाठी कोणतेही प्लानिंग न करता हा प्रवास पूर्ण झाला आहे. दरम्यान, व्हिसा आणि फंडाची आवश्यकता होती. तीन टप्प्यांत मिळालेल्या फंडातून हा प्रवास यशस्वी झाला. अमेरिकेचा व्हिसा नसल्याने हा प्रवास आठ ते नऊ महिने लांबणीवर पडला. तीन वर्षांत चार खंडांतील ३५ देश फिरलो. याची सुरुवात आणि त्याची सांगताही ठाण्यात झाल्याने खूप आनंदी आहे.- विष्णुदास चापके
तीन वर्षांच्या जगभ्रमंतीनंतर शेतकरीपुत्र ठाण्यात परतला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:04 AM