भातसानगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडले आहे. या सरकारने लबाडाचे राजकारण केले असून एक नवा पैसाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. उलट शेतकऱ्यांच्या हिताच्या याेजना या सरकारने बंद केल्यात, असा आराेप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शहापूर येथे केला.
भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शीतल तोंडलिकर, माजी सभापती सुभाष हरड, तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, ज्येष्ठ नेते अशोक इरनक, शहरप्रमुख विवेक नार्वेकर, वैदेही नार्वेकर आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी शेतीची आवश्यक असणाऱ्या अवजारांचा लकी ड्रॉ काढण्यात आला.फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत. त्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहचल्या पाहिजेत. यासाठी अशा शेतकरी मेळाव्यांची गरज आहे. फळबागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. विमा कंपन्यांनी तीन हजार कोटींचा नफा कमावला, मात्र शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.
शेततळ्यांसाठी आम्ही जास्तीत जास्त अनुदान दिले. गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी अवजारे घेण्यासाठी एक कोटींचे अनुदान देणारी योजना या सरकारने बंद केली. तालुक्यात धरणे असतानाही प्यायला पाणी नाही, यासारखे दुर्दैव नाही. दरम्यान, या मेळाव्यानिमित्त एका रात्रीत ते खड्डे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाने बुजविल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत हाेते.