भिवंडी : भात खरेदी केंद्रांवर जानेवारी महिन्यात विक्री केलेल्या भाताचा मोबदला शेतकऱ्यांना दोन महिन्यानंतरही मिळाला नसल्याने तालुक्यातील ६७ शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
भिवंडी तालुक्यातील अंबाडी परिसरातील भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी दुगाड फाटा येथील भात खरेदी केंद्रावर जानेवारी महिन्यात आपल्या भाताची विक्री केलेली आहे.हिवाळी सेवा सोसायटीच्या माध्यमातून हा भात खरेदी विक्रीचा व्यवहार जानेवारी महिन्यात झालेला आहे. मात्र दोन महिने उलटल्यानंतरही ६७ शेतकऱ्यांची भाताच्या मोबदल्याची रक्कम थकलेली आहे.तालुक्यात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून एका शेतकऱ्यांचे किमान ५० हजारहुन अधिक देणी थकली आहेत.त्यातच मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी सोसायटीचे काढलेल्या कर्जाच्या फेडीसाठीचा तगादा सोसायट्यांकडून लागला जात असून ऐन लग्नसराईत हातात हक्काचे पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
जानेवारी महिन्यात केलेल्या भात विक्रीचे हक्काचे पैसे शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून लवकरात लवकर देणी मिळाली नाही तर दुगाड फाटा भात खरेदी केंद्रावर शेतकरीआंदोलन करतील अशी प्रतिक्रिया शेतकरी शिवाजी राऊत यांनी दिली आहे.