सदानंद नाईक, उल्हासनगर: कॅम्प नं-४, गुरुनानक शाळा परिसरासह शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ प्रा. सुरेश सोनावणे, वामदेव भोयर व विशाल सोनावणे या तिघांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. १५ दिवसांत महापालिकेने याबाबत निर्णय घेतला नाही तर जनआंदोलन करण्याचा इशारा सुरेश सोनावणे यांनी दिला.
उल्हासनगरात भुयारी गटार योजने अंतर्गत रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरु आहे. कॅम्प नं-४ गुरुनानक शाळा परिसरात रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकले आहे. मात्र खोदलेल्या रस्त्याची दुरस्ती न झाल्याने, शाळेतील मुले पडून जखमी होत आहेत. तसेच मोटरसायकली पडण्याच्या घटना घडत असून खोदलेल्या रस्त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे नागरिक, वृद्ध व मुलांना श्वसनाचे त्रास सुरु झाल्याचा आरोपी समाजसेवक वामदेव भोयर यांनी केला. रस्त्याची दुरस्ती वारंवार निवेदन देऊनही होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवार पासून गुरुनानक शाळा परिसरात प्रा. सुरेश सोनावणे, वामदेव भोयर व विशाल सोनावणे यांनी आमरण उपोषण सुरु केले.
गुरुनानक शाळा परिसरातील रस्त्यासह शहरातील रस्त्याची दुरस्ती करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी महापालिका आयुक्ताकडे केली. तसेच येत्या १५ दिवसात रस्ते दुरस्ती झाली नाहीतर, शहरांत जणआंदोलन करण्याचा इशारा सुरेश सोनावणे, वामदेव भोयर यांनी दिला. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेकडो स्थानिक नागरिकांनी उपोषणस्थळाला भेट दिली असून शालेय विधार्थी याठिकाणी येऊन रस्ता बांधणीची मागणी. करीत आहेत. उपोषणाला नागरिकांचा वाढता पाठिंबा बघून महापालिका प्रशासन काय भूमिका घेते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.