कल्याणः केंद्रात असणाऱ्या भाजपा सरकारच्या सामाजिक धोरणांविरोधात आज कल्याणमध्येही जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आमदार संजय दत्त आणि कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ज्यामध्ये काँग्रेसचे कल्याण डोंबिवलीतील अनेक पदाधिकारी- कार्यकर्ते सहभागी झाले.केंद्रात 4 वर्षांपूर्वी आलेल्या भाजपा सरकारने चुकीची आणि द्वेषपूर्ण सामाजिक धोरणं राबवली आहेत. ज्यामुळे सध्या समाजात आपल्याला उभी फूट पडलेली पाहायला मिळत असल्याचे आमदार संजय दत्त यांनी सांगितले. भाजपाच्या या धोरणांविरोधात राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात लाक्षणिक उपोषणाची हाक दिली आहे.
त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पातळीवर प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार लाक्षणिक आंदोलन सुरू असल्याचेही आमदार दत्त म्हणाले. तर विविधतेत एकता ही आपल्या देशाची गेल्या कित्येक दशकांची ओळख आहे. वेगवेगळे समाज याठिकाणी अनेक वर्षांपासून शांततेत राहत आहेत. मात्र जेव्हापासून देशात आणि राज्यांत भाजपा सरकार आले तेव्हापासून इथला जातीय सलोखा बिघडला असून सध्या त्याने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामूळे या उपोषणाच्या माध्यमातून लोकांनी संयम बाळगण्याचे आवाहन करीत असल्याची माहिती कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली.
या आंदोलनात ज्येष्ठ नेत्या अलका आवळस्कर, प्रदेश प्रवक्ते ब्रिज दत्त, डोंबिवली शहराध्यक्ष संतोष केणे, महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी, सुरेंद्र आढाव, विमल ठक्कर, अल्पसंख्याक सेलचे शकील खान यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत