ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी क्षेत्रात वीटभट्टीवर काम करण्यासाठी जिल्ह्यातील तसेच बाजूच्या पालघरसह इतर जिल्ह्यांतील बहुतेक आदिवासी कुटुंबे स्थलांतरित होऊन मजुरीसाठी येत असतात. या कुटुंबांतील गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. या घटकाला अंगणवाडी सेवांतर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, वाढीची देखरेख या सेवा प्राधान्याने दिल्या जातात. त्याचबरोबर या लाभार्थ्यांची आरोग्य तपासणीसुद्धा केली जाते. त्यात कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुषमा लोणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटस्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने विशेष मोहीम राबवण्यात आली. यावेळी वीटभट्टीनिहाय मजुरांसाठी आरोग्य तपासणी मोहिमेबरोबरच तिथे काम करणारे मजूर वापरत असलेल्या पाण्याचीदेखील तपासणी करण्यात आली. यावेळी पाच तालुक्यांतील एक हजार ३५३ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणी मोहिमेचा अहवाल प्राप्त झाला असून पाच तालुक्यांमध्ये ४६२ ठिकाणी पाणी शुद्धीकरण केले नसल्याची बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे या पाण्याचा येथे काम करणारे मजूर पिण्यासाठीदेखील वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मजुरांमध्ये अशुद्ध पाण्यामुळे जलजन्य आजार होण्याचा धोका लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पाणी शुद्धीकरणाचा विषय प्राधान्याने घेण्याच्या सूचना केल्या.
.......................