ठाणे: जिल्ह्यातील ६२ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीमध्ये ९२८ जणांनी नशिब अजमावले आहे. जिल्ह्याभरातील या ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक व पाेटनिवडणुकीसाठी एक लाख एक हजार २३२ मतदानापैकी साडेतीन वाजेपर्यंत ६२.५४ टक्के म्हणजे ५८ हजार ७३३ मतदान झाले. साडेपाच वाजेपर्यंतच्या मतदानाच्या माहितीला विलंब हाेणार असल्यामुळे दरम्यान ७५ ते ८० टक्के मतदान झाल्याचा आंदाज तहसीलदार संजय भाेसले यांनी व्यक्त केला. आज शांततेत झालेल्या या मतदानाची ६ नाेव्हेंबरला त्या त्या तहसीलदार कार्यालयात मतमाेजणी हाेणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सार्वत्रिक ४८ ग्राम पंचायतींच्या ३८९ जागांवरील ८५४ उमेदवारांना १८३ मतदान केंद्रांवर मतदान झाले. या ग्राम पंचायतींच्या ९३ हजार ९०४ मतदारांपैकी साडेतीन वाजेपर्यंत ५८ हजार ७३३ मतदारांनी (६२.५४ टक्के) मतदानाचा हक्के बजावला. यामध्ये २७ हजार ८३९ महिलांचा समावेश आहे. तर पाेटनिवडणुकीच्या १४ ग्राम पंचायतींच्या सात हजार ३२८ मतदारांपैकी चार हजार ४३६ (६०.५३ टक्के) जणांनी मतदान केले आहे. जिल्ह्याभरातील २०० मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रीया आज शांततेत पार पडली.
सार्वत्रिक निवडणुकीच्या ६१ पैकी १२ ग्राम पंचायती आधीच बिनविरोध विजयी झालेल्या आहेत. तर शहापूरच्या एका ग्राम पंचायतीसाठी एकही उमेदवारी दाखल झालेली नाही. याशिवाय पाेटनिवडणूक असलेल्या ६० पैकी ३१ ग्राम पंचायतींच्या पोटनिवडणुका ह्या बिनविरोध झाल्या आहेत. तर सातच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रीया पार पडणार नसल्याचे उघड झाले. सार्वत्रिक व पोटनिवडणूक आदी मिळून ६२ ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात रविवारी शांततेत मतदान झाले आहे.