मुरलीधर भवार।
कल्याण : ती अंधारी काळरात्र होती. पत्त्यासारखी आमची धोकादायक इमारत कोसळली. त्यात माझ्या आईचा जीव गेला. तेव्हापासून आम्ही विस्थापित झालो. मित्राने दिलेल्या भाड्याच्या खोलीत एकाकी जीवन जगत आहे. गेली सहा वर्षे आमची इमारत पडीक अवस्थेत आहे. तिचा पुनर्विकास झाला नाही. त्यामुळे विस्थापितांचे जीणे जगत आहे, अशी खंत रवींद्र रेड्डीज या तरुणाने व्यक्त केली. जेव्हाजेव्हा ती भग्नावस्थेतील बिल्डिंग पाहतो, तेव्हा तेथे खेळलेले बालपण, फुललेले तरुणपण आठवूनआठवून माझे डोळे डबडबतात, असेही रेड्डीज म्हणाले.
ठाकुर्ली येथील मातृकृपा इमारतीत रेड्डीज कुटुंब राहत होते. रवींद्र यांच्या वडिलांचे निधन झालेले होते. आई सुलक्षणा यांची सत्तरी झाली होती. पायाला त्रास होत असल्याने त्यांना अंथरुणावरून पटकन उठून कुठेही जाणे इतकेच काय घरातल्या घरात ऊठबस करणे लवकर शक्य होत नव्हते. त्यांचा लहान मुलगा रवींद्र हा इस्टेट एजंटचे काम करीत होता. त्याचा भाऊ दीपक हा मुंबईला कामाला जात होता. दोन्ही भाऊ कामावरून दमूनभागून आल्यावर आई व त्यांच्या दोघांच्या जेवणाची तयारी करीत असे. त्या रात्री भाऊ कामावरून लवकर घरी आला नव्हता. रवींद्र हा घराच्या बाहेरच इमारतीच्या परिसरात मित्रासोबत बोलत होता. घरात आई अंथरुणावर होती. रात्री सव्वादहाच्या सुमारास त्यांची धोकादायक इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि हाहाकार उडाला.१२ रहिवाशांचा मृत्यू, २७ कुटुंबे झाली बेघरमातृकृपा इमारत कोसळल्यानंतर एकच मोठ्ठा आवाज झाला. तसेच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने काळ्याकुट्ट अंधाराचे साम्राज्य पसरले. रवींद्र यांनी त्याच अंधारात, धुळीच्या लोटांत आईला शोधण्याचा प्रयत्न केला. तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला. इमारतीत २७ कुटुंबे राहत होती. ती बेघर झाली. त्यापैकीच रेड्डीज यांचे एक कुटुंब होते.