ठाणे - लहानपणापासून अनेकांना विविध छंद जडलेले असतात. मुंब्य्रात राहणाऱ्या एका युवकाला मात्र स्मशानभूमीत जाऊन सरण रचणे, स्मशानातील परिसर स्वच्छ करणे, असा छंद जडला आहे. लहानपणापासून तो येथील स्मशानभूमीत हा छंद जोपासत आहे. यापुढे त्याला शेवटपर्यंत ही सेवा आणि छंद जपून ठेवायचा आहे. आता त्याचे वडील हयात नाहीत, पण त्यांची आठवण म्हणून तो रोज स्मशानभूमीत जातो.मुंब्रा येथील बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या बोंबे कुटुंबात जन्माला आलेला महेश याचा जन्म या वसाहतीत झाला. वडील बेस्टमध्ये कामाला असल्याने त्यांना या वसाहतीत राहण्यासाठी जागा मिळाली होती. महेश यांचा जन्म याच वसाहतीत झाला. ते राहत असलेल्या इमारतीच्या बाजूलाच मुंब्रा स्मशानभूमी आहे. त्यामुळे येथे येणारे प्रेत पाहतपाहतच महेश मोठा झाला. वडिलांचा हात धरून तो रोज स्मशानभूमीत येत असे. रोजच येथे येत असल्याने अशा जागेत भ्यायचे असते, हे महेशला कधी वाटलेच नाही. त्यामुळे स्मशानाच्या परिसरातच तो लहानाचा मोठा झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही महेश रोज येथे येतो आहे. पण, आता तो येथे येऊन फक्त स्मशानात फेरफटका मारीत नाही, तर येथे येणारे प्रेत जाळण्यासाठी मदत करतो.
त्याच्या खुशीतच आईचा आनंद घरात आई आणि तो असे दोघेच असल्याने पोटापाण्याला जेमतेम खर्च लागतो. त्यासाठी तो शिफ्टने रिक्षा चालवितो. शिफ्ट आणि घरखर्चासाठी लागणारा पैसा जमताच त्याचे पाय स्मशानाकडे वळतात. मग, सुरू होते त्याची स्मशानसेवा. त्याचा हा रोजचा क्रम आहे. आईदेखील या कामासाठी त्याला काही म्हणत नाही. त्याच्या खुशीतच तिचा आनंद आहे. कोरोनाच्या काळातही महेशची ही सेवा सुरू आहे. येथे आल्यावर त्याला त्याच्या वडिलांच्या सान्निध्यात असल्यासारखे वाटते.