ठाणे - मागील 40-40 वर्षे एका पक्षाशी निष्ठा ठेवल्यानंतर केवळ पुत्र प्रेमासाठी आणि त्याच्या स्वार्थासाठी नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. परंतु, जात असतांना दुसऱ्या पक्षाच्या काल परवा झालेल्या नेत्यांपुढे मुजरा करावा लागतो, ही अतिशय दुर्देवाची गोष्ट असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यामुळे आम्ही वंशाच्या दिवा नसलो तरी आम्ही स्वाभिमानी असून आम्ही आमच्या वडिलांना आमच्या स्वार्थासाठी कुणापुढेही मुजरा करायला लावत नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीतून भाजप व शिवसेनेत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांना टोला लगावला.
ठाण्यात गुरुवारी संवाद दौऱ्यासाठी सुळे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही खंत व्यक्त केली. जे जात आहेत, त्यांच्यावर देखील दबाव आणला जात असून कोणाची बॅंक घोटाळे, कारखाने, तर कोणाची चौकशी लावू म्हणून पक्षात घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जे जात असतील त्यांच्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत. तटकरे, भास्कर जाधव आदी मंडळीसुद्धा राष्ट्रवादी सोडत असल्याचा प्रश्न त्यांना केला असता, जी नावे घेतली जात आहेत, त्या नावांना मोठं कोणी केलं. पक्षानेच त्यांना मोठं केलं असून त्यामुळेच ते आज मोठे झाले आहेत, त्यामुळे संघटनेपुढे नाव हे छोटेस असते असेही त्यांनी सांगितले. गणेश नाईक यांच्याबाबतही त्यांना छेडले असता, माझ्या माहितीनुसार सध्या तरी ते राष्ट्रवादीतच असल्याचे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. आज मुख्यमंत्र्यांचा दौरा जालन्यात होता, मात्र त्याठिकाणच्याच एका मुलीवर बलात्कार झाला असून त्यावर साधे भाष्यही मुख्यमंत्र्यांनी केले नाही, ही अतिशय खेदाची बाब असल्याचे सुळेंनी म्हटले. सध्याचे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरुन समजत आहे. राज्यात किंवा देशात महिला सुरक्षित नाहीत, त्यांच्यावरील अत्याचार वाढतच आहेत. असे असतांना त्यांना सुरक्षितता देण्याऐवजी भाजप सरकार केवळ राजकारण करत असल्याची टिकाही त्यांनी केली. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुंबईत मोर्चा काढला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी चर्चा केली असता, ठाण्यातील वाहतूक कोंडी किती भंयकर आहे, याची जाणीव झाली आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी पावले उचलली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु अवघ्या साडेतीन किमीचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना दोन ठिकाणी टोल द्यावा लागत आहे. युती सरकार जेव्हा सत्तेत येणार होते, तेव्हा त्यांनी टोलमुक्तीचा वादा केला होता. परंतु, आजही टोलमुक्ती झाली नसल्याने याविरोधात आंदोलन पुकारले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काश्मीरमधील 370 कलम हटविल्यानंतर काश्मिरमध्ये सध्या काय सुरू आहे, हे कोणालाच माहित नाही. तेथील नेत्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, त्यांचे फोन लागत नाहीत, त्यामुळे ही दडपशाहीच आहे, असे म्हणणे योग्य ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदी नाही, असे सरकार म्हणत आहे, मग बेरोजगारांना नोकरी का मिळत नाही, उद्योगधंदे का बंद होत आहेत, असा सवाल उपस्थित करुन ही बेरोजगारी नसून सुशिक्षित बेरोजगारी असल्याचेही त्या म्हणाल्या.
गटनेते हणमंत जगदाळे यांनी गटनेतेपदाचा राजीनामा का दिला, याविषयाची माहिती घेतली जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करुन यामागे नेमकी काय कारणे आहेत, हे जाणून घेतले जाईल. तसेच त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.