ठाणे : आपल्याच पोटच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या ५० वर्षीय पित्याला तीन वर्षे सक्तमजुरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि विशेष पोक्सो न्यायाधीश एन.के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी सुनावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षाही न्यायालयाने सुनावली.
मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर न्यायाधीश ब्रह्मे यांनी ठाणे न्यायालयात सुनावलेली ही पहिलीच शिक्षा आहे. आरोपी, तक्रारदार आई आणि पीडित मुलगी असे तिघे १ ऑगस्ट २०१४ रोजी रात्रीचे जेवण करून घरात झोपले होते. त्या वेळी आरोपीने १ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान आपल्याच मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेने या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. याचा जाब विचारल्यानंतर पित्याने तिच्या आईला शिवीगाळ करीत मारहाण केली. मुलीच्या आईने अखेर मीरा रोड पोलीस ठाण्यात या नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर आणि सहायक पोलीस निरीक्षक पी.एस. साळुंखे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली होती. तपासाअंती या प्रकरणी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्यायाधीश ब्रह्मे यांच्या न्यायालयात आल्यानंतर सरकारी वकील संजय मोरे यांनी भक्कम पुरावे सादर करीत तीन साक्षीदार हजर करून आरोपीला शिक्षा देण्यासाठी जोरदार बाजू मांडली. यामध्ये साक्षीदारांची साक्षही महत्त्वाची ठरली. त्याच आधारे आरोपीला दोषी ठरवून त्याला तीन वर्षे कारावासासह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडातील पाच हजार रुपये पीडितेला आणि उर्वरित पाच हजार रुपये शासनाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षाही सुनावली. न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार श्रीराम भोसले यांनी काम पाहिले.