जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: स्वत:च्याच सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३१ वर्षीय पित्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने शुक्रवारी सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार आहे.
कळव्याच्या घाेलाईनगर भागात राहणाऱ्या या नराधम पित्याने २ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घरातच आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. याबाबत मुलीच्या आईने आपल्या पतीविरुद्ध ३ डिसेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अटक केली होती. याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश देशमुख यांच्या न्यायालयात ६ ऑक्टाेंबर २०२३ रोजी झाली.
सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडली. यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. शिवाय, पिडित मुलीनेही स्वत: वडिलांविरुद्ध साक्षीच्या वेळी घटना सांगितली होती. हा प्रकार दोनदा घडला होता. तसेच वैद्यकीय चाचणीमध्येही तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले होते. तपासी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे यांनी काम पाहिले. सर्व पुरावे ग्राहय धरुन आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून पोक्सो कायद्यांतर्गत दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.