ऑनलाइन लोकमत
भातसानगर, दि. ९ : शहापूर तालुक्यातील मुरबीचापाडा येथे राहणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलीला रात्री साप चावल्याने तिला शहापूर येथील उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने पुढील उपचारांसाठी ठाणे येथे नेत असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही बातमी कळताच तिच्या वडिलांनीही प्राण सोडले. या घटनेनंतर तिच्या आईचीही प्रकृती चिंताजनक झाली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
रेश्मा धावू वाख (१३) असे या मुलीचे नाव असून, भातसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी मुरबीचापाडा येथे ती राहत होती. ती रात्री घरात झोपली असताना, काहीतरी चावल्याचे तिने वडील धावू बाळू वाख (४८) यांना सांगितले. त्यांनी तिला घेऊन पहाटे साडेतीनच्या सुमारास उपरुग्णालय गाठले. तेथे उपचार केले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहाटे ४च्या सुमारास ठाणे येथे जात असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला. हे कळताच तिच्या वडिलांना शोक अनावर झाला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या आईची प्रकृतीही गंभीर झाल्याने पाड्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी एक घटनायाच रात्री या गावातील सोमी शिडू भगत या महिलेलाही सर्पदंश झाला. या महिलेलाही उपरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.