नितीन पंडित।लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेमुळे येथील अनेक कुटुंबांवर दु:खाचे आघात झाले आहेत. येथील प्रत्येक कुटुंबाने काहीनाकाही गमावले आहे. शब्बीर कुरेशी यांचे पाय चार दिवसांपासून ढिगाºयाजवळच घुटमळत आहेत. त्यांचा अडीच वर्षांचा चिमुरडा मुसिफ याचा अद्याप शोध लागलेला नसल्याने शब्बीर यांचा जीव कासावीस झाला आहे.
पटेल कम्पाउंड येथील तीन माजली जिलानी इमारत सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोसळली होती. ३८ जणांचा बळी घेणाºया या दुर्घटनेमध्ये गुरुवारी तब्बल ८0 तासांच्या परिश्रमानंतर बचाव पथकाने शोधमोहीम थांबवली. या दुर्घटनेत शब्बीर कुरेशी यांनी आपल्या पत्नीसह दोन लहानगी मुले गमावली आहेत. मात्र, शोधमोहीम थांबल्यानंतरदेखील अडीच वर्षांच्या मुसिफचा शोध लागला नसल्याने शब्बीर मागील चार दिवसांपासून इमारतीच्या ढिगाºयात मुलाला शोधत आहेत.
शब्बीर दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पहिल्या माळ्यावर राहायला होते. इमारत कोसळण्याच्या काही मिनिटे आधी शब्बीरने आजूबाजूच्या रहिवाशांना झोपेतून उठवले व तातडीने इमारत खाली करण्याचा सल्ला दिला. इतरांचा जीव आपुलकीने वाचवणारे शब्बीर त्यांची पत्नी व दोन मुलांना वाचवू शकले नाही. आयुष्यभर ही सल मनात राहील, असे शब्बीर कुरेशी म्हणाले. अडीच वर्षांचा मुसिफ या दुर्घटनेत बेपत्ता झाला आहे. तो अजूनही मिळाला नाही. मी शोध पथकाला त्याला शोधायला सांगितले होते. आता शोधमोहीम थांबलीय, मात्र मी माझ्या चिमुरड्याची कायम वाट पाहत राहीन, अशी भावनिक प्रतिक्रिया शब्बीर कुरेशी यांनी यावेळी व्यक्त केली.