अंबरनाथ - अंबरनाथच्या नगरपालिकेजवळ असलेल्या मुख्य रिक्षा स्टँड जवळ काही रिक्षा चालकांनी युनियनच्या फलकावर सूचना लिहिली असून ती सूचना भलतीच व्हायरल झाली आहे. ज्या रिक्षा चालकांकडे बॅच आणि लायसन नाही अशा रिक्षा चालकांनी रात्री आठ नंतर स्टॅंडवर रिक्षा चालवावी अशी सूचना त्या फलकावर लावण्यात आली होती. मात्र या प्रकरणी खुद्द रिक्षा चालक-मालक संघटनेने आक्षेप नोंदवला असून असा चुकीचा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अंबरनाथ पश्चिम येथील नगरपालिकेजवळ असलेल्या जठार रिक्षा स्टँडवर संघटनेच्या अधिकृत फलकावर चुकीची सूचना लिहिण्यात आली होती. त्यावर 'ज्या रिक्षा चालकांकडे लायसन्स आणि बॅच नाही त्यांनी रात्री आठ नंतरच रिक्षा स्टॅन्ड वर धंदा करावा' अशी सूचना लिहिली होती. हा प्रकार जाणून बुजून करण्यात आला असून गेल्या काही महिन्यांपासून रिक्षा संघटनेने भंगारात निघालेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेक रिक्षा चालक भंगार्यातल्या रिक्षा वापरून कोणतेही बॅच आणि लायसन नसताना मुख्य स्टॅन्डवर आणि शहरातील इतर स्टॅंडवर व्यवसाय करीत होते. त्याचा फटका प्रामाणिक रिक्षा चालकांना बसत होता. यासंदर्भात तक्रारी वाढल्यानंतर रिक्षा चालक मालक संघटनेने आरटीओ कार्यालयाला आणि वाहतूक विभागाला या संदर्भात तक्रार केली होती. मात्र सततच्या पाठपुराव्यानंतर देखील कोणतेही कारवाई होताना दिसत नाही.
रिक्षा संघटना सातत्याने कालबाह्य झालेल्या रिक्षांवर कारवाई करावी यासाठी पाठपुरा करीत असल्याने काही रिक्षाचालकांनी संघटनेलाच अडचणीत आणण्यासाठी फलकावर ही सूचना लिहिण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही बाब रीक्षा संघटनेच्या लक्षात येताच त्यांनी या फलकावरील सूचना पूसली असून ही सूचना नेमके कोणी लिहिली त्याचा शोध घेत त्या संदर्भात वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार घडत असताना आता कालबाह्य झालेल्या रिक्षांवर आणि लायसन व बॅच नसलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी यासाठी आता संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे. याप्रकरणी रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांना विचारले असता हा खोडसाळपणा असून काही रिक्षा चालकाने संघटनेला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.