लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : निकृष्ट दर्जाच्या खाद्य तेलाचे उत्पादन करणाºया ठाणे तालुक्यातील पिंपरी येथील कंपनीवर ठाणे अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये २६ लाख ८५ हजारांचे विविध प्रकारचे ३३ हजार ४९२ किलो ग्रॅम खाद्य तेल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) यशवंत दौंडे तसेच राहूल तकटे, गौेतम जगताप आणि व्यंकट चौव्हाण या अधिकाऱ्यांनी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एनएम एंटरप्रायजेस या पिंपरी येथील कंपनीवर धाड टाकून कारवाई केली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणात तेलाची विक्री होते. या कंपनीत भेसळयुक्त तसेच निकृष्ट दर्जाच्या तेलाची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे या पथकाने ही कारवाई केली. या कंपनीमध्ये सकस, चांगल्या दर्जाचे आणि सुरक्षित खाद्य तेलाची निर्मिती होते का? याच्या तपासणीसाठी कंपनीची सुसज्ज प्रयोगशाळा नव्हती. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रीयेवर निरीक्षणासाठी तज्ज्ञ व्यक्ती नव्हती. खाद्य तेल ज्या मानांकनामध्ये निर्मिती होणे अपेक्षित आहे, तसा त्याचा दर्जा नव्हता. शिवाय, ते पॅकिंग करण्यााठीही योग्य खबरदारी घेतलेली नव्हती. अशा अनेक त्रुटींमुळे गाळा क्रमांक ९५२ मधील या तेल उत्पादनाच्या कारखान्यातील २१ लाख ४१ हजार ५९२ रुपयांचे २९ हजार ९९६ किलो ग्रॅम रिफाइन सोयाबिन तेल, एक लाख ४३ हजार ८०८ रुपयांचे एक हजार ४९८ किलो ग्रॅम वजनाचे पामोलिन तेल आणि तीन लाख ९९ हजार ६०० रुपयांचे एक हजार ९९८ किलो ग्रॅम वजनाचे खोबरेल तेल याठिकाणी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वीही या कंपनीने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यामुळेच आता या कंपनीला नियमांचे पालन करण्याच्या अधीन राहून उत्पादन थांबविण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे सह आयुक्त देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
निकृष्ट दर्जाच्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर ठाण्यात एफडीएची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:20 PM
निकृष्ट दर्जाच्या खाद्य तेलाचे उत्पादन करणाºया ठाणे तालुक्यातील पिंपरी येथील कंपनीवर ठाणे अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये २६ लाख ८५ हजारांचे विविध प्रकारचे खाद्य तेल जप्त करण्यात आले. या कंपनीला नियमांचे पालन करण्याच्या अधीन राहून उत्पादन थांबविण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्दे २६ लाख ८५ हजारांचे ३३ हजार ४९२ किलो खाद्य तेल जप्त उत्पादन थांबविण्याची बजावली नोटीस