ठाणे: विनापरवाना चहा पावडरवर प्रक्रिया करणाऱ्या मुंब्र्यातील मे. ईनाम टी एजन्सी, या पेढीवर मंगळवारी ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून 1098 किलोचा चहा पावडर व 95 किलो केसरी रंग असा 1,30 ,550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.तसेच तेथून तीन चहा पावडरचे व केशरी रंग (भेसळकारी पदार्थ) असे चार नमुने घेतल्याची एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंब्रा- कौसा येथील कादर पॅलेस हरमन मंजिल, मे. ईनाम टी एजन्सीच्या रूम नंबर ८,९; या पेढीची मिळालेल्या माहितीनुसार तपासणी केली.त्यामध्ये ती पेढी विनापरवाना चहा पावडर वर प्रक्रिया करत असल्याचे आढळून आले. येथून चहा पावडरला केसरी रंग लावून अडीचशे ग्रॅम पॅकिंगमध्ये विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले. यावेळी 1098 किलोचा चहा पावडर व 95 किलो केसरी रंग एकूण किंमत रुपये 1,30,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पेढी विनापरवाना व्यवसाय करत असल्याने व चहा पावडर ला खाद्यरंग लावून त्याची विक्री करत असल्याने, अन्न परवाना नोंदणी नियमन 2011चे नियमन 2.1.14 अंतर्गत सदर ठिकाणी व्यवसाय न करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
ही कारवाई सह आयुक्त ( कोकण विभाग) शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी यु.एस. लोहकरे, रा. द.मुंडे व संतोष सिरोसिया या पथकाने केल्याची माहिती पदनिर्देशित अधिकारी राजेंद्र रुणवाल दिली.