भिवंडी - भिवंडी येथे बनावट मावा बनवणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाने धाड टाकत तब्बल दोन लाख रुपये किंमतीचा मावा आणि चायनीज सॉस जप्त केला आहे. मात्र, या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी लोनाड-हरणापाडा येथील एमएम फूड्स या बेकायदेशीर सुरू असलेल्या कंपनीवर ही धाड टाकण्यात आली.
लोनाड हरणापाडा येथे एम.एम. फूड्स ही कंपनी विनापरवाना सुरू असल्याची तक्रार अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यांनतर त्यांनी पथकाचे शंकर राठोड यांच्यासह एम. एम. फूड्स या कंपनीवर छापा टाकला असता त्यांना कंपनीकडे कोणताही सरकारी परवाना नसल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी दूध पावडर, डाळडा आणि साखर यांच्या मिश्रणातून हलक्या दर्जाचा बनावट मावा बनविला जात असल्याचे आणि बाजारात बर्फी या ब्रॅंडने तो प्रति किलो सव्वाशे रुपये दराने विक्री करीत असल्याचे उघडकीस आले. त्याचप्रमाणे चायनीज खाद्य पदार्थात हमखास आढळणारे डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉसचे उत्पादनही या ठिकाणी बनवत असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापक सत्येंद्र रणजित सिंग यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने या कंपनीतून९३ हजार ७५० किंमतीचा ७५० किलो मावा, ३० हजार ६०० रुपयांचा डार्क सॉस २७० किलो व ५४ हजारांचा रेड चिली सॉस ४५० किलो असा एकूण एक लाख ७८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कंपनीला सील केले.