ठाणे : होळी आणि धुळवड आल्यावर दरवर्षी धावत्या लोकलवर फुगे तसेच अन्य तत्सम पदार्थ फेकून मारले जातात. त्यामुळे प्रवासी जखमी तसेच एखाद्यावेळी मयत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी वेळीच खबरदारी लक्षात घेऊन कळवा-मुंब्रा या रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिमकडील झोपडपट्टीत बैठकी घेऊन जनजागृती मोहिम हाती घेतली आहे.यात रहिवाशांना कायदेशीर कारवाईची माहिती देताना, असे कृत्य करणा-यांबाबत कोणी नजरेस पडल्यास तातडीने रेल्वे हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे.१३ फेब्रुवारी रोजी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान, लोकलमधून फेकलेल्या दारूची बाटली डोक्यात लागून रेल्वेचा गँगमन जखमी झाला होता. त्यातच, येत्या १ आणि २ मार्चला होळी आणि धुळवड असे सण असल्याने त्या आधीच लोकलवर फुगे किंवा तत्सम पदार्थ फेकण्याची शक्यता लक्षात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिम बाजूस असलेल्या प्रामुख्याने कळवा-मुंब्रा या शहर हद्दीतील शांतीनगर,शिवाजी नगर,भोलानगर, इंदिरानगर व वाघोबानगर या झोपडपट्टींना भेट देण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य आदींनी झोपडपट्ट्यांना भेटी देऊन बैठका घेणे सुरू केले आहे. या बैठकीत धावत्या लोकलवर फूगे अथवा तत्सम पदार्थ फेकून मारु नये. तसे केल्यास गाडीतील प्रवासी गंभीररित्या जखमी होऊ शकतो किंवा एखाद्याचा नाहक बळी जाऊ शकतो याची माहिती दिली. त्याचबरोबर असे करणाºयास कायद्याने शिक्षा हो शकते. याबाबत यावेळी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच असे कृत्य करताना कोणी दिसल्यास त्यांची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे हेल्पलाईन क्र मांक ९८३३३३११११ वर देण्याचे आवाहन केले आहे.रेल्वे ट्रॅकच्या परिसरात झोपडपट्टी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच,या झोपडपट्टीतून फुगे मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेवेळीच खबरदारी म्हणून तेथील नागरिकांच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही बैठकी घेऊन त्यांचे प्रबोधन करण्याचे काम सुरू केले आहे.- उत्तम सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग
होळीत लोकलवर फुगे मारण्याची भीती, ठाणे लोहमार्ग पोलिसांची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:58 AM