भातसानगर : परिवहन महामंडळाचे शहापूर बस स्थानक कधीही कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे, शिवाय नवीन बस स्थानकाचे कामही संथ गतीने सुरू आहे. शहापूरमधील परिवहन महामंडळाचे हे जुने बस स्थानक आहे. ते मोडकळीस आल्याने ते कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे धोकादायक बस स्थानक प्रवासी असताना कोसळले, तर मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बस पोर्ट नव्याने होण्यासाठी काम सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बाजूला तात्पुरत्या स्वरूपातील व्यवस्था करणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याच डेपोची पाहणी करून, प्रवाशांची तात्पुरत्या स्वरूपात बाजूला पत्र्याचे स्टॅण्ड उभारण्याचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणीही केली नाही. त्यामुळे प्रवासी हाच स्टँडचा आधार घेत आहेत. हे स्टँड कोसळून जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. स्टँडच्या वरील भागातील स्लॅब व लोखंडी खांब वाकलेल्या स्थितीत असून, त्यांनी आपल्या जागा सोडल्याने ते कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने व बस ही याच दरम्यान लागत असल्याने, प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करण्यासाठी येथे येउन आपल्या बसची वाट पाहत बसत आहेत. या संदर्भात आगार व्यवस्थापक सतीश वाणी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, सध्या बस स्थानकाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. नादुरुस्त असलेले बस स्थानक कोसळण्याची भीती असल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला लेखी कळविण्यात आले असल्याचे सांगितले.