डोंबिवली : कोरोनाच्या धसक्याने परदेशातून आलेल्या व्यक्तींना त्यांच्याच घरात राहण्यास इमारतीमधील रहिवाशांनी मनाई केल्याचे प्रकरण डोंबिवली पूर्वेत उघडकीस आले आहे. हा विषय पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लागणच झाली नसल्याचे समोर आले. मात्र, त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे ही व्यक्ती पुन्हा परदेशात निघून गेली.पूर्वेत राहणारी एक व्यक्ती परदेशातून परतली होती. ही माहिती इमारतीमधील रहिवाशांना मिळाली. त्यांनी इमारतीमध्ये राहण्यास या व्यक्तीला मनाई केली. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी मध्यस्थी करत त्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. विमानतळावरील वैद्यकीय तपासणीमध्ये आपल्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याची बाजू ऐकण्यास रहिवासी तयार नसल्याने कस्तुरबा रुग्णालयात तपासणी करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. मात्र, या मानसिक त्रासामुळे त्या व्यक्तीने पुन्हा परदेशात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली.कल्याणमध्ये अशाच प्रकारची घटना मंगळवारी घडली होती. परदेशातून आलेल्या एका व्यक्तीला इमारतीमध्ये राहण्यास रहिवाशांनी मनाई केली. पोलिसांनी मध्यस्थी केली, मात्र त्या व्यक्तीने कस्तुरबा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे तेथील रहिवाशांचे म्हणणे होते.
धास्ती कोरोनाची, लोकांच्या विरोधास कंटाळून पुन्हा परदेशी प्रस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 2:25 AM