- स्नेहा पावसकरठाणे : साधारण चार वर्षांपूर्वी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा चलनातून बंद होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आणि तत्क्षणी त्या नोटा व्यापाऱ्यांना देणाऱ्यांची तसेच दुसऱ्या दिवशी सकाळीच बँकांबाहेर नोटा जमा करण्यासाठी लोकांची रांग लागली. आता असे थेट कोणी जाहीर केलेले नसले तरी या बाबत आलेल्या बातम्यांमुळे जुन्या १००, १० आणि पाच रुपयांच्या आपल्याजवळच्या नोटा लोकांनी बाजारात वापरायला किंवा बॅंकेत जमा करायला बऱ्यापैकी सुरुवात केली आहे. १० आणि १०० रुपयांच्या नोटा सर्रास वापरल्या जातात. कोणत्याही व्यवहारात या नोटांची अधिक देवघेव होते. मात्र आता १००, १० आणि ५ च्या जुन्या छपाईच्या नोटा लवकरच वापरातून बंद होणार असल्याची चर्चा सुरू होती. एका बॅंकेने याबाबत संकेत दिल्याचे वृत्तही होते. त्यामुळे ५००, १००० च्या नोटा बंद झाल्यावर पुरती दमछाक झालेली जनता आधीपासूनच या नोटा बाहेर खपवण्याच्या मागे लागली आहे. मात्र व्यापारी किंवा दुकानदार या नोटा सहजपणे स्वीकारताना व इतरांना देताना दिसत आहेत.
अजूनही व्यापारी स्वीकारत आहेत नोटा
आरबीआयने अशा प्रकारचे काहीतरी संकेत दिल्याची चर्चा होती. मात्र १००, १० किंवा ५ रुपयांच्या नोटा अजून पूर्ण बंद केलेल्या नाही. त्यामुळे आम्ही त्या घ्यायला नकार देत नाही. सध्या तर पाच रुपयांची नोट तर खूप कमी पाहायला मिळते.- नचिकेत जैसवाल, व्यापारी
१००, १० व ५ रुपयाच्या नोटा लवकरच बंद होणार असून त्या जमा करण्याबाबते वृत्त ऐकले. त्या दिवसापासून येणारे ग्राहक शक्यतो जुन्या नोटा घेऊन येतात. परंतु अद्याप बाजारात त्याबाबत अधिकृत किंवा पूर्ण माहिती नसल्याने आम्ही त्या घेतो. - विरल चव्हाण, व्यापारी
बँकेला कोणतीही सूचना नाहीजुन्या १००, १० आणि पाच रुपयांच्या नोटा लवकरच बंद होणार, अशी चर्चा होती. त्यामुळे अनेकांनी वैयक्तिक आणि बँकेत येऊनही चौकशी केली, मात्र आम्हाला बँकेत अद्याप अशा प्रकारची कोणतीही नोटीस किंवा सूचना आलेल्या नाहीत, अशी माहिती एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जुन्या नोटांचे प्रमाण चलनात वाढले सामान्य माणूस खूप मोठ्या प्रमाणात बँकेत या नोटा किंवा त्याचे बंडल जमा करत नसला तरी जमा होणाऱ्या नोटांमध्ये १०० च्या जुन्या नोटांचे प्रमाण अधिक आहे. तसेच बाजार, प्रवासभाडे अशाप्रकारच्या व्यवहारात याच जुन्या नोटा सर्रास वापरल्या जाताना दिसत आहेत.मोदींनी चार वर्षांपूर्वी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सर्वाधिक हाल हे सामान्य माणसाचे झाले होते. नोटा बँकेत जमा करण्यासाठी सामान्यांच्या रांगा लागल्या होत्या. आताही १००, १० व पाचच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी ऐकायला मिळाल्या आणि पुन्हा नोटाबंदीच्या काळाची आठवण झाली. अद्याप या नोटा बंद होण्याबाबत अधिकृत माहिती कोणी सांगितलेली नसली तरी या चर्चा ऐकता नंतर एकदम या जुन्या नोटा जमा करण्यासाठी धावपळ होऊ नये, म्हणून सामान्य माणूस या नोटा आपल्या जवळून बाहेर काढत आहे. - दीपांकर तिलके, सामान्य नागरिक