मीरा रोड : इकोसेन्सेटिव्ह झोन असूनदेखील नदी व नैसर्गिक ओढ्यात तसेच परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या भरावामुळे वरसावे नाका ते काजूपाडादरम्यानच्या घोडबंदर महामार्गावर यंदासुद्धा पावसाळ्यात पाणी साचून रस्ता बंद होण्याची भीती आहे. वाहतूक पोलिसांनी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली; परंतु मीरा भाईंदर महापालिकेने या पाहणीकडे पाठ फिरवत समस्येबाबत गांभीर्य दाखवले नाही.
वरसावे ते चेणे परिसरात लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे खाली वाहून येतात. हा परिसर इकोसेन्सेटिव्ह झोन आहे. वरसावे येथील अनुहा लॉजजवळच्या परिसरात प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे. येथून महामार्गाच्या खालून जाणारी नैसर्गिक उपखाडी तर भराव करून अतिशय अरुंद केली असून, महापालिकेने तर चक्क काँक्रिटचे बांधकाम करून टाकले आहे.
एक्स्प्रेस इन हॉटेलजवळून जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाहसुद्धा नावापुरताच उरला आहे. येथील सीएन रॉक हॉटेल परिसरात मातीचा प्रचंड भराव झाला आहे. चेणे येथील लक्ष्मी नदीपात्रातच प्रचंड भराव करून नदीचे पात्र अरुंद बनले आहे. शिवाय परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात भराव झालेले आहेत. इकोसेन्सेटिव्ह झोन तसेच नदी व ओढे आणि परिसरात गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड भरावामुळे पावसाळ्यात येथील घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जातो. महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. तसेच चेणे गावात पूर येतो.
स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी पाड्यातील रहिवाशांनी या भरावा विरोधात तक्रारी केल्या असल्या तरी त्यांना कोणी दाद देत नाही. येथील अजय पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने आदेश देऊनदेखील महापालिकेने अजून काही कारवाई केलेली नाही.
घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जात असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेस पत्र दिले होते; परंतु पालिकेने सदर रस्ता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याशी संपर्क करण्याचे वाहतूक शाखेला कळवले. त्याअनुषंगाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे, उपनिरीक्षक एम. जी. पाटील यांच्यासह ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे वरसावे नाका ते काजूपाडा भागाची पाहणी केली. यावेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. या दौऱ्यानंतर आवश्यक पावले उचलली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.