मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका व एमएमआरडीए च्या माध्यमातून सुरु असलेली शहरातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरण ची कामे हि पावसाला सुरवात झाल्याने धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे .
मीरा भाईंदर शहरात खड्डे मुक्त रस्त्यांसाठी एमएमआरडीए आणि महापालिका यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरु आहे . सदर कामे सुरु करण्यासह पालिकेच्या अंतर्गत नवीन मोठ्या जलवाहिन्या अंथरण्याची कामे देखील सुरु केली गेली . खोदकाम केल्यावर नवीन जलवाहिनी टाकणे , जलवाहिनी स्थलांतरित करणे या सह वीज केबल , गॅस लाईन , टेलिफोन लाईन , फायबर केबल , नळ जोडण्या व मलनिःस्सारण जोडण्या देखील स्थलांतरित कराव्या लागल्याने त्यात बराच विलंब झाला . या शिवाय अनेक महापालिका कामांच्या ठिकाणी निधी अभावी सुद्धा कामना विलंब झाल्याचे बोलले जाते .
आधी ३१ मे पर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटम महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दिला असला तरी त्यांनाच जवळपास २२ दिवस निवडणूक कामी अन्य राज्यात गेल्याने रस्ते कामात देखील संस्थपणा आला . आता रविवार पासून पावसाला सुरवात झाली व पहिल्याच पावसात खोदून ठेवलेल्या रस्त्यांच्या ठिकाणी पाणी साचले . तेथील माती दलदलीची झाली आहे .
आधीच रस्ते खोदून ठेवलेल्या ठिकाणी पुरेसे बेराकेटिंग नाही . त्यामुळे काही वाहने खड्ड्यात पडल्याचे वा अपघात घडल्याचे प्रकार आहेत . लोकांना चालताना जीव मुठीत ठेऊन चालावे लागते . पाऊस जोराचा सुरु राहिल्यास खड्ड्यात पाणी साचून तो आणखी धोकादायक ठरू शकतो . त्यामुळे अर्धवट राहिलेली कामे आता दही=धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.