ठाणे : बँकेकडून येणारे धमकीवजा कर्जवसुलीचे फोन, भरमसाट आलेले वीजबिल, शाळेची फी आणि घरखर्च यांचा ताळमेळ कसा बसवायचा, या विवंचनेत असतानाच पुन्हा कोरोनाची भयाण परिस्थिती उभी राहू पाहत आहे. त्यामुळे रोज होणाऱ्या अवघ्या २००-३०० रुपयांच्या कमाईतून संसाराचा गाडा कसा हाकायचा, अशा विवंचनेत ठाण्यातील अबोली महिला रिक्षाचालक पडल्या आहेत.
देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. महाराष्ट्रातसुद्धा तिची शक्यता वर्तविली जात असल्याने यामुळे निर्माण होणाऱ्या कठीण परिस्थितीचा सामना कसा करायचा, याची जुळवणी त्या करू लागल्या आहेत. ठाण्यात सुमारे एक हजार महिला रिक्षाचालक आहेत. महिलांना आर्थिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी सरकारकडून रिक्षापरवाना आणि बँकेकडून कर्जाच्या रिक्षा पुरविल्या आहेत. या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यातील बहुतांश महिला विधवा, गरीब, घटस्फोटित व इतर समस्यांनी पिडलेल्या आहेत. परंतु, कोरोनाचा संसर्ग आणि बँकेच्या अमानवी कर्जवसुलीने त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. कोरोनामुळे सहासात महिने सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला. आता हळूहळू शिथिलता आल्याने रिक्षांची वाहतूक सुरू झाली आहे. परंतु, रेल्वेची सुविधा सुरू नसल्याने त्याचा रिक्षावाहतुकीवर परिणाम होऊन रोज २००-३०० रुपयांची कमाई होत आहे. एवढ्यात रिक्षाचा गॅस, वाहतूक पोलीस आणि आरटीओची कारवाई, बँकेचे हप्ते, शाळेची फी, लाइटबिल, औषधपाणी, घरभाड्यासह कुटुंबाचे पोट कसे भरायचे, याची चिंता त्यांना सतावत आहे.
लॉकडाऊनमध्ये बँकेचे काही हप्ते थकल्याने बँकेकडून फोन येत असून थेट लायकी काढली जाते. मुलगा शाळेत गेलेला नसतानाही शाळेची संपूर्ण फी भरावी लागते. वाढीव वीजबिल आले आहे. पोलिसांची कारवाई, गाडीचे मेंटेनन्स आणि घरखर्च रोज आठनऊ तास रिक्षा चालवून त्यामधून मिळणाऱ्या २०० ते ३०० रुपयांत कसे भागवायचे? - मीरा धायजे, अबोली रिक्षाचालक, ठाणे