लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा कहर जीवघेणा ठरतो की काय, या भीतीने जिल्ह्यातील ९९ लाख ४२ हजार ४०७ नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे. जिल्हाभरात यापैकी केवळ २२ लाख ८४ हजार २६६ जणांचे लसीकरण झाले आहे. यातही या संसर्गाची फारसी भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे बोलणारे अवघे आठ टक्के नागरिक या दुसऱ्या डोसचे लाभार्थी आहेत. यामुळे दुसऱ्या लाटेच्या सावटाखाली तिसऱ्या लाटेचा कहर थरकाप उडवणारा ठरू शकतो, अशा चर्चा जिल्ह्यात रंगल्या आहेत.
ठाणे जिल्हा मुंबई या जागतिक महानगराला लागून असल्याने या महामारीच्या काळात अधिक सावधानतेने वावरावे लागत आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी आदी २६८ रुग्णालयांकडून आतापर्यंत अवघे २२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्येही बुडत्याला काठीचा आधार असलेल्या पहिल्या डोसचे केवळ २३ टक्के म्हणजे १६ लाख ८३ हजार ७४२ जणांचे लसीकरण शक्य झाले आहे. तर निर्बंधांचे पालन करूनही जीव धोक्यात असल्याची जाणीव ठेवून वावरणाऱ्या दुसऱ्या डोसचे फक्ते आठ टक्के म्हणजे सहा लाख ५२४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत २६८ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक कोविशिल्डच्या लसचा गवगवा आहे. याखालोखाल कोव्हॅक्सिन आणि अत्यल्प स्पुतनिकची लस घेण्याकडे लाभार्थ्यांचा कल आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी दुसऱ्या डोसचे लसीकरण होण्याची आवश्यकता आहे. या डोसच्या अवघ्या आठ टक्के लाभार्थ्यांचा विचार करता त्यात झपाट्याने वाढ होण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातही सध्याचा पाऊस नैसर्गिक आपत्तीला कवटाळून धोधो पडत आहे. लसीकरण केंद्रांच्या परिसरात तलाव साचत आहेत. त्यात जीव मुठीत घेऊन रांगेत उभ्या असणाऱ्यांना इंजेक्शन मिळेपर्यंत या कोरोना प्रतिबंधात्मक डोसची खात्री होत नसल्याचे अनुभव नकोसे झाल्याचे ऐकायला मिळत आहे.
-------