लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले असून दुसऱ्या लाटेत रुग्णासंख्या झपाट्याने वाढली आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. त्यामुळे सध्या राज्यभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भिवंडी ग्रामीण भागातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना संकट कमी व्हावे म्हणून लसीकरणास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागात लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात आजही शंका असल्याने ते लसीकरणापासून दूर राहणे पसंत करतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. शहरात जसे लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे तसे न करता केवळ आधार कार्ड व इतर ओळखपत्रांच्या आधारावर लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, तरीही ग्रामीण भागातील अनेक नागरिक आजही लस घेण्याबाबत फारसे जागरूक नाहीत. त्यांच्यात लसींबाबत आजही अनेक गैरसमज आहेत.
भिवंडीतील अनेक आदिवासी पाडे व पाच्छापूर, गाणे , फिरिंगपाडा , लाखीवली अशा दुर्गम भागातील नागरिकांना तर लसींबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारी यंत्रणाही अपयशी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बहुसंख्य आदिवासी पाड्यांवर व दुर्गम भागातील आदिवासी बांधव लसीकारणापासून वंचित आहेत. लसीकरणाबाबत दुर्गम भागातील नागरिकांना नेमके लसीकरण कुठे आणि कसे होणार, याचीही माहिती यंत्रणेकडून व्यवस्थित मिळत नसल्याने आम्ही लसीकरणासाठी कुठे जावे, याबाबतही दुर्गम भागातील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या गावापासून शहर दूर असल्याने लसीकरणासाठी वाहनाची व्यवस्थाही नाही, तर मग आम्ही लस घ्यायला लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ तरी कसे, अशी प्रतिक्रिया चिराडपाडा येथील रहिवासी प्रकाश कुंडलिक वाघे या तरुणाने दिली आहे.
कोरोना लस १८ वर्षांपासून पुढे सर्वांना देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर १८ वर्षांवरील तरुणांना अनेक वेळा लस दिली जात नसल्याने तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्णासंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील लसीबाबतचे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया राहुल हरिभाऊ ढमने या तरुणाने दिली आहे.