ठाणे : घोडबंदर रोड आनंदनगर येथील एस.जी. इंग्लिश स्कूलचे प्रकरण मनसेने उघडकीस आणल्यानंतर त्याच संस्थेने अजून एका ठिकाणी सुरु केलेल्या शाळेचा भंडाफोड मनसेने केला आहे. या शाळेची फी अवघी १०० रु पये, १५ ते २० विद्यार्थ्यांची पटसंख्या, शाळा की कोंडवाडा अशा दूरवस्थेत मानपाडा, कृष्णानगर येथील शाळा सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत मनसेने शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करुन सखोल चौकशीची मागणी केली आहे.टिकुजिनी वाडी येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये कृष्णानगर येथे सदर शाळा सुरू असून या शाळेमध्ये पदवी नसलेले शिक्षक शिकवत आहेत. अस्वच्छ वर्ग, शौचालयांचा अभाव, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी पोषक नसलेले वातावरण, मुलभूत सुविधांपासून विद्यार्थी वंचित अशात २० विद्यार्थ्यांची ही शाळा १०० रुपये महिना तर वार्षिक १५० रुपये घेऊन भरते. ही शाळा तीन वर्षांपासून येथे या अवस्थेत सुरू असून या अगोदर अनिधकृत बांधकाम म्हणून ठाणे महापालिकेने या शाळेवर कारवाई केली होती. तरीसुद्धा गेल्या तीन वर्षांपासून या अवस्थेत ही शाळा सुरू असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. या संस्थेच्या सर्व शाळांतील शिक्षकांची बिंदु नामावलीमार्फत (रोस्टर) चौकशी व्हावी, सदर संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, तसेच अशा संस्थांची दखल घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरु पाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनविसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी केली आहे. या शाळांवर कारवाई न झाल्यास मनसे आंदोलन करेल असा इशाराही दिला आहे. यावेळी मनविसेचे शहर अध्यक्ष किरण पाटील, ठाणे शहर सचिव सचिन सरोदे व अरविंद बाचकर, उपशहर अध्यक्ष दीपक जाधव व विजय रोकडे, विभाग अध्यक्ष विजय दिघे, उपविभाग अध्यक्ष हेमंत मोरे व इतर उपस्थित होते.कृष्णानगर येथे माझी शाळा होती. परंतू ती ठाणे महापालिकेने तोडल्यावर ती जागा उजाड झाली आहे. एक महिला माझ्याकडे आली आणि तिने मुलांना शिकवण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी मी तिला शिकवण्याची परवानगी दिली. आजूबाजूच्या झोपडपट्टीतील पाच ते सहा मुले शिकायला येतात. शाळा नोंदणीकृत नाही.- रामक्रित यादव, विश्वस्त, एस.जी.स्कूल
फी १०० रुपये, विद्यार्थी फक्त २०; परप्रांतीय शिक्षण संस्थेकडून शिक्षणाचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:01 AM