ठाणे : पक्ष्यांना खायला घालणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा आहे व आपल्या अनावश्यक कृतीमुळे कुरव पक्ष्यांच्या स्थलांतरावर व राहण्या-खाण्याच्या सवयींवर विपरीत परिणाम संभवतो याची नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे ही विशेष जनजागरण मोहीम येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या सहभागी संस्था व मराठा जागृती मंच, ठाणे यांच्यातर्फे राबविण्यात आली.
-------------------------------
चौकट
तलावांची कुरव पक्ष्यांनी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी केलेली निवड कौतुकास्पद
भारतात हिवाळ्याच्या सुरुवातीला सुमारे २३० प्रकारचे पक्षी परदेशांतून स्थलांतर करून येतात. यामध्ये सीगल्स म्हणजेच कुरव पक्षीही हजारोंच्या संख्येने किनारपट्टीच्या प्रदेशात स्थलांतर करतात. सप्टेंबर ते एप्रिलदरम्यान हे अतिथी आपल्याला पाणथळ जागा जसे की समुद्रकिनाऱ्यांवर, खाडीक्षेत्र अथवा तलावांवर स्वछंदीपणे विहार करताना आढळतात. ठाण्याला विस्तीर्ण असे खाडीक्षेत्र लाभले आहे. त्यामुळे दरवर्षी नित्यनेमाने अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी आपल्याकडे पाहावयास मिळतात. ठाण्याची खाडी जशी जगप्रसिद्ध आहे, तसेच ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. आजमितीस ठाण्यामध्ये ३५ तलाव आहेत. या तलावांमध्येसुद्धा गेल्या काही वर्षांपासून स्थलांतरित कुरव पक्षी आढळून येत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या तलावांची या पक्ष्यांनी तात्पुरत्या निवाऱ्यासाठी केलेली निवड ही ठाणेकरांसाठी निश्चितच गौरवास्पद बाब आहे.
------------------------
चौकट
सामान्य नागरिकांनी आपल्या शहरातल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या रूपाने आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या आरोग्याच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवावी. पक्ष्यांना तेलकट प्रक्रिया केलेले फूड खायला घालू नये, असे करणे हा दंडनीय अपराध आहे.
रोहित जोशी, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी
..............
आयत्या खाण्याच्या आमिषाने येणाऱ्या कुरव पक्ष्यांमध्ये खाद्य बळकावण्यासाठी झटापटी होतात. मासुंदा तलाव शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने इथे सतत वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या धडकेने अपघात होऊन कुरव पक्षी मृत झाल्याच्या घटना घडत आहेत. तरी नागरिकांनी जबाबदारीने वागावे.
संगीता जाधव, मराठा जागृती मंच, ठाणे
---------