डोंबिवली : रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांना रेल्वे प्रशासन अभय देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वेला स्थानक परिसरातील डॉ. राथ रोडवर बसणारे फेरीवाले त्यांचे सामान तेथील डिलक्स टॉयलेटमध्ये ठेवत आहेत. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सगळ्यांचेच पितळ उघडे पडले.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरातील १५० मीटरच्या हद्दीत व्यवसाय करण्यास मनाई आहे. मात्र, डोंबिवलीत पूर्वेला सर्रासपणे फेरीवाले आपले बस्तान तेथे मांडतात. केडीएमसीचे पथक कारवाईसाठी आल्यावर त्यांची पळापळ होते. अशा वेळी फेरीवाले त्यांचे सामान रेल्वेच्या हद्दीतील डिलक्स टॉयलेटच्या आवारात ठेवतात. स्थानक परिसरात बर्फाच्या गोळ्यांची गाडी लागते. गोळेविक्रेता बर्फाची लादी टॉयलेटच्या परिसरात ठेवतो.महापालिका अथवा रेल्वे प्रशासनाची तोंडदेखली कारवाई होते, तेव्हा डॉ. राथ रोड काही क्षणांत मोकळा कसा होतो, हे देखील आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले. सामान ठेवण्यासाठी रेल्वेची जागा मिळत असेल, तर महापालिकेने कितीही प्रयत्न केले, तरीही फेरीवाला हटता हटणार नाही, अशी टीका प्रवाशांनी केली.>स्वच्छतेचे तीनतेरारेल्वेस्थानकातील फलाट-३ आणि ४ वरील कल्याण दिशेकडील स्वच्छतागृहात कमालीची घाण असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. तेथे कोणी जाऊ शकणार नाही, एवढा कचरा, मल असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्वच्छता मोहिमेचे रेल्वेने तीनतेरा वाजवल्याचे स्पष्ट होत आहे.
फेरीवाल्यांचे सामान टॉयलेटमध्ये, सोशल मीडियावर व्हायरल, प्रवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 3:07 AM