डोंबिवली: उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना रेल्वेस्थानक परिसरात घालून दिलेल्या १५० मीटरच्या मर्यादेचे पालन ‘ग’ प्रभागात काहीअंशी होत आहे. मात्र, त्याच्या शेजारी असलेल्या ‘फ’ प्रभागात फेरीवाले व भाजीविक्रेते जोमात व्यवसाय करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. ‘ग’ प्रभागातील कारवाईमुळे तेथील काही फेरीवाल्यांनी ‘फ’ प्रभागात स्थलांतर केल्याचे बोलले जात आहे. तेथे ‘ना फेरीवाला क्षेत्रा’च्या फलकाखालीच भाजीपालाविक्रेत्यांनी बाजार मांडल्याने पथकाच्या कारवाईवरच शंका उपस्थित होत आहे.रेल्वे स्थानक परिसरातील १५० मीटर हद्दीत अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने विशेष पथके नेमली आहेत. यातील केवळ डोंबिवली पूर्व-पश्चिमेतील ‘ग’ आणि ‘ह’ प्रभागातील रेल्वे स्थानक परिसरात प्रभावीपणे कारवाई होताना दिसते. परंतु, कल्याणमधील ‘क’ आणि डोंबिवली पूर्वेतील ‘फ’ प्रभागात मात्र फेरीवाले आणि भाजीविक्रेत्यांनी बिनदिक्कतपणे ‘बाजार’ मांडल्याने फेरीवालाविरोधी पथके गेली कुणीकडे?, असा सवाल नागरिक विचारत आहेत.२०१४ मधील सर्वेक्षणानुसार केडीएमसी हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. त्यांना लवकरच ओळखपत्र दिली जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त बोडके यांनी आॅगस्टमध्ये नगरपथ विक्रेता समितीच्या बैठकीत दिली होती. परंतु, सर्वेक्षणांती पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना पुन्हा कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले. ही मोहिमही नोव्हेंबरपर्यंत चालली. परंतु, आजवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.दरम्यान, केडीएमसीचा हा वेळकाढूपणा सुरू असताना एकीकडे कारवाईचा फार्स करायचा आणि दुसरीकडे व्यवसायास मुभा दयायची, अशी काहीशी दुटप्पीपणाची भूमिका केडीएमसीची तर नाही ना?, अशीही शंका उपस्थित होत आहे. या संदर्भात केडीएमसीचे ‘फ’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी भारत पवार यांच्याशी मोबाइलवर ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?डोंबिवलीत ‘फ’ प्रभागातील रेल्वे स्थानक परिसर तसेच स्कायवॉकवरील फेरीवाल्यांकडे केडीएमसीच्या पथकाचे दुर्लक्ष झाले आहे. हा स्कायवॉक ‘ग’ प्रभागाला लागून असल्याने त्यांचे पथक काही वेळेस तेथे कारवाई करते. परंतु, ‘फ’ प्रभागातील पथके या स्कायवॉकवर फिरकत नसल्याने ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,’ असे म्हणण्याची वेळ अन्य पथकातील कर्मचाºयांवर आली आहे.
‘फ’ प्रभागात बिनदिक्कत भरतोय फेरीवाल्यांचा बाजार, केडीएमसीचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 3:35 AM