कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ मार्चला झालेल्या निवडणुकीत बाराव्या गणातील मतपेटीतून धूर आल्याने त्यातील मतपत्रिका जळाल्या होत्या. त्यामुळे या गणासाठी उद्या रविवार, २४ मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. या गणात ४४२ मतदार आहेत.बाजार समितीच्या १६ गणांसाठी १७ मार्चला मतदान झाले होते. २९ मतदान केंद्रांवरील मतपेट्या समितीच्या आवारात मतदान प्रक्रिया संपल्यावर आणत असताना बाराव्या गणातील मतपेटीतून धूर येत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मतपेटी उघडली असता, त्यात मतपत्रिका जळत असल्याचे दिसून आले. निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पाटील यांनी हा प्रकार निवडणूक आयोगासह जिल्हाधिकाऱ्यांना कळवला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी १८ मार्चच्या मतमोजणीला स्थगिती दिली. तसेच बाराव्या गणासाठी २४ मार्चला फेरमतदान घेण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानुसार, उद्या हे मतदान होणार आहे. तर, २५ मार्चला सर्व मतपेट्यांतील मतांची मोजणी करून निकाल जाहीर केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.१७ मार्चला मतपत्रिका जळाल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सुरक्षिततेची काळजी घ्यावी. या गणातील मतपेट्या या स्वतंत्र स्ट्राँग रूममध्ये ठेवाव्यात, अशी मागणी निवडणूक अधिकारी पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
एपीएमसीच्या बाराव्या गणासाठी आज फेरमतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 1:06 AM