ठाणे : शास्त्रीय गायन आणि कथ्थक नृत्याने पं. राम मराठे संगीत समारोहाचा दुसरा दिवस रंगला. ठाणे महापालिकेच्या वतीने व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या समारोहाचे दुसरे पुष्प शनिवारी गुंफण्यात आले. या दिवसाच्या शेवटच्या सत्राचे आकर्षण ठरले ते पं. राजेंद्र गंगाणी यांचे सादरीकरण. त्यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याला ठाणेकर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या पं. राम मराठे संगीत समारोहाच्या दुसºया दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरु वात शास्त्रीय गायिका दीपा पराडकर-साठे यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी सुरु वातीला श्री राग सादर केला. त्यानंतर धानी राग सादर करून त्यांचे आजोबा आर.एन. पराडकर यांचा ‘ध्यास हा जीवाला, पंढरीसी जाऊ’ हा अभंग सादर केला.
यावेळी हार्मोनियमची साथ अनंत जोशी, तर तबलासाथ तेजोवृष जोशी यांनी दिली. श्रद्धा जोशी यांनी दुसºया दिवशीच्या दुसºया सत्रात कथ्थक नृत्यातून दुर्गावंदना व ठुमरी सादर केली. गत, तोडे, तत्कार, घुंगुरांचा लयबद्ध आवाज आणि तालवादकासह नृत्याच्या जुगलबंदीने त्यांनी रसिकांची मने जिंकली. तिसºया सत्राची सुरु वात यशश्री कडलासकर यांच्या यमन राग सादरीकरणाने झाली. त्यांनी भजन सादर करून या महोत्सवाची रंगत वाढविली. यावेळी हार्मोनियमची साथ अनिरुद्ध गोसावी, तबल्याची साथ रोहित मुझुमदार, तानपुºयाची साथ अंजली पटवर्धन आणि सिद्धी पटवर्धन यांनी दिली.
त्यानंतर, युवा शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड यांनी रागेश्री राग सादर केला. त्यांनी ‘सय्या फिर याद आये’ आणि ‘का करू सजनी आये ना बालम’ ही ठुमरी सादर केली. त्यांना तबलासाथ रामकृष्ण कळंबेकर, संवादिनीसाथ सिद्धेश बिचोलकर, तानपुरासाथ ओमकार सोनवणे व जनार्दन गायकवाड यांनी दिली. शेवटच्या सत्रात पं. राजेंद्र गंगाणी यांनी सादर केलेल्या कथ्थक नृत्याला ठाणेकर रसिकांनी चांगलीच दाद दिली. त्यांच्या कथ्थक नृत्यातील गती आणि ठहराव यांच्या विशेष शैलीतील सादरीकरणाद्वारे थेट प्रेक्षकांशी संवाद साधला गेला. त्यांना तबलासाथ दिली पं. कालिनाथ मिश्रा, सारंगीसाथ संदीप मिश्रा, बासरी डॉ. हिमांशू गिंडे तर गायनाची साथ पुष्पराज भागवत यांनी दिली.