ठाणे - नाते जपायला परीपक्व असायला लागते, मात्र ते अजून परिपक्व झालेले नाहीत, त्यांचे रक्त सळसळते आहे, त्यामुळे आपल्याला बापाच्या भुमिकेत जाऊन त्यांनी समजावून घेतले पाहिजे असा सल्ला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. मात्र त्यावर पलटवार करीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील मला परिपक्व व्हायचे नसल्याचे सांगत, मुलगा मोठा होत असेल त्याला यश मिळत असेल तर त्याचा त्रास बापाला होत असेल तर याला कोणते नाते म्हणायचे असा पलटवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांना लगावला.
खारेगाव उड्डाणपुलावरुन श्रेयवादाच्या लढाईनंतर आघाडीचे सुतोवाच आव्हाड आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असतांनाच अवघ्या काही क्षणात या आघाडीत पुन्हा ठिणगी पडल्याचे दिसून आले. आव्हाड यांनी या पुलासाठी माजी खासदार आनंद परांजपे यांनीच पाठपुरावा केल्याचा उल्लेख करुन मंजुरी देखील त्यांनीच मिळवून दिली आहे. मात्र पुलाचे काम का लांबले याचे उत्तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील असल्याचे त्यांनी सांगितले. सुरवातीपासून मी आघाडीचा धर्म पाळत आहे, राष्ट्रवादीच्या बाजूने आघाडी पक्की असून आता उर्वरीत निर्णय त्यांना घ्यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय नरेश म्हस्के हे महापौर होत असतांना त्यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणो झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता आम्ही ही निवड बिनविरोध केल्याची आठवण त्यांनी म्हस्के यांना करुन दिली.
दुसरीकडे आव्हाडांनी केलेल्या या हल्याला खासदार शिंदे आणि महापौर म्हस्के यांनी पलटवार केला. मला परिपक्व व्हायचे नसून मुलाच्या यशाने जर बापाला त्रस होत असेल तर त्या नात्याला काय म्हणावे असा टोला खासदार शिंदे यांनी आव्हाड यांना लगावला. विकासाचे राजकारण आम्हाला करायचे नाही, आणि आघाडीचा निर्णय हा केवळ शिवसेनेत आदेशानुसार घेतला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीलाच आघाडी नसल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. तर महापौर निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली होती. असे असतांनाही राष्ट्रवादीला महिला बालकल्याण समिती, प्रभाग समिती आणि परिवहनचे सदस्य दिले होते. त्या बदल्यात त्यांनी ही निवडणुक बिनविरोध करुन दिली होती, कदाचित आव्हाडांना त्याचा विसर पडला असेल म्हणून त्याची आठवण करुन देत असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्ष जो आदेश देईल त्यानुसार आघाडी करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.