सुरेश लोखंडे, ठाणे: शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली खासगी शाळांमध्ये २५ टकके शालेय प्रवेश माेफत दिले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील दाेन हजार ६१६ शाळांमध्ये सहा हजार ८२८ प्रवेश रिक्त ठेवण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून बुधवारच्या शेवटच्या दिवसापर्यंत फक्त तीन हजार ९०९ ऑनलाइन अर्ज पालकांकडून भरण्यात आलेले आहे. केजी ते पहिल्या वर्गात यातून प्रवेश दिला जात असला तरी रिक्त जागांपेक्षा ४३ टक्के अर्ज कमी आलेले दिसून येत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस हाेता. मात्र रिक्त जागांच्या तुलनेत दाेन हजार ९१९ अर्ज कमी आलेले आहे. तब्बल ४३ टक्के अर्ज कमी आहे. त्यामुळे शासनाकडून या अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ हाेण्याची अपेक्षा बहुतांशी पालकांकडून व्यक्त केली जात आहे पण आजच्या शेवटच्या दिवशी तरी मुदत वाढ दिल्याची सूचना मिळाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.