डोंबिवली : फेरीवाल्यांमध्ये झालेल्या राडेबाजीनंतर सोशल मीडियावर केडीएमसीला लक्ष्य करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आयुक्त गोविंद बोडके यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवारी प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. चार प्रभागक्षेत्र अधिकारी, ५० पालिकेचे कर्मचारी आणि ४० पोलीस कर्मचारी यांनी एकत्र केलेल्या कारवाईत अतिक्रमण करणाºया स्टॉलची मोडतोड केली तर हातगाड्याही जप्त करण्यात आल्या.
फेरीवाल्यांच्या दोन गटांत बसण्याच्या जागेवरून सोमवारी हाणामारीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही फेरीवाला अतिक्रमणप्रकरणी ठोस, अशी कारवाई केडीएमसीकडून हाती घेण्यात आली नव्हती. केडीएमसीच्या या ढिम्म कारभाराविरोधात सोशल मीडियावरही संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, मनसेने डोंबिवली पूर्वेकडील फेरीवाल्यांसह दुकानदारांकडून केले जात असलेल्या अतिक्रमणावर तोफ डागण्यात आली. बुधवारी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीनंतर दोन दिवसांत अतिक्रमण नाही हटले तर रस्त्यावर उतरून मनसे स्टाइलने आंदोलन छेडू, असा इशारा दिला. त्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही फेरीवाला अतिक्रमणप्रकरणी आयुक्त गोविंद बोडके यांना लक्ष्य करीत त्यांना खरमरीत पत्र पाठविले. यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी अधिकाºयांची झाडाझडती घेतल्याची माहिती मिळत आहे. यामुळेच प्रभाग अधिकाºयांनी बुधवारी सायंकाळी एकत्रित फेरीवाला अतिक्रमणाविरोधात कारवाईची मोहीम उघडल्याची चर्चा आहे. या कारवाईत ‘ग’ प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप, ‘फ’ प्रभागाचे अधिकारी दीपक शिंदे, ‘ई’ प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड आणि ‘ह’ प्रभाग अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे आदींसह सर्व प्रभागातील फेरीवाला विरोधी पथकातील एकूण ५० कर्मचारी आणि त्यांच्या सोबतीला ४० पोलीस कर्मचारी होते.
उच्च न्यायालयाने मनाई केलेल्या हद्दीतील फेरीवाला अतिक्रमणावर ही कारवाई करण्यात आली. यात चार ते पाच हातगाड्या तोडण्यात आल्या. सहा हातगाड्या जप्तही करण्यात आल्या. पाणीपुरीचे पाच स्टॉलही तोडण्यात आले. दुकानाबाहेर ठेवलेल्या जादा साहित्यांवरही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ही कारवाई सुरू झाली असली तरी त्यात सातत्य राहते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून ही कारवाई किती दिवस चालणार हा प्रश्न आहे.कारवाई हा दिखावा :बुधवारी कारवाई झाली, पण ही कारवाई म्हणजे नुसता दिखावा असल्याचे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. याआधीही बºयाच वेळा अशा कारवाया पाहायला मिळाल्या, पण त्यात सातत्य राहत नसल्याने फेरीवाला अतिक्रमणाची स्थिती जागोजागी पुन्हा दिसून येते. कारवाईत ढिलाईपणा का येतो हे अधिकाºयांनाच माहीत; पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनाई केलेल्या हद्दीत तरी अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी, ही अपेक्षा. - अजित सांगेकर, पादचारीसातत्य राहील : अधिकाºयांचा दावाएखादी घटना घडल्यावर कारवाईचा फार्स केडीएमसीकडून केला जातो हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे बुधवारी झालेल्या कारवाईप्रकरणीही साशंकता व्यक्त होत आहे. ही कारवाई पुढे अशीच चालू राहील का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रभाग अधिकारी चंद्रकांत जगताप आणि दीपक शिंदे यांनी मात्र महापालिकेच्या कारवाईत सातत्य राहील, असा दावा ‘लोकमत’शी बोलताना केला.