नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडीतआग लागल्याच्या घटना थांबता थांबत नसून दापोडा गावच्या हद्दीत हरिहर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका रंग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रश कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. गोदामाला लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दापोडा गावातील हरिहर कॉम्प्लेक्स येथे हॅरीस ब्रसेस इंडिया प्रा. लि. या कंपनीत मोठ्या प्रमाणात पेंटिंग ब्रश बनवले जात असून मोठ्या प्रमाणावर ब्रश व केमिकलचा साठा साठविण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी या गोदामाला भीषण आग लागली असून आगीचे कारण अजून समजू शकले नाही.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी , कल्याण व ठाणे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीच्या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. भिवंडीत आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात मात्र शासकीय यंत्रणा या आगिंकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात भिवंडीचा भोपाळ होऊ नये अशी भीती दक्ष नागरिक व्यक्त करीत आहेत.